शिवप्रहार न्युज - हरेगावात कबूतर चोरल्याच्या संशयातून अंगावर लघुशंका करून खुनाचा प्रयत्न;पालकमंत्री ना.विखे पाटलांची तात्काळ भेट…
हरेगावात कबूतर चोरल्याच्या संशयातून अंगावर लघुशंका करून खुनाचा प्रयत्न;पालकमंत्री ना.विखे पाटलांची तात्काळ भेट…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन ते चार तरुणांना कबूतर चोरल्याच्या संशयातून झाडाला बांधून उलटे टांगून ,बेदम मारहाण करून,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपींनी पीडित तरुणांना शिवीगाळ करत ,जातीवाचक बोलून लाजिरवाणे कृत्य करायला लावून, जर पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली.
या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून घटनेचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ भेट देवुन जखमींची आस्थेने विचारपूस केली व आरोपींवर कडक कारवाईचे पोलीसांना आदेश दिले.
दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलिसांत शुभम विजय माघाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे सर्व राहणार -हरेगाव ता.श्रीरामपूर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 307, 364, 342, 506, 504, 143, 148,149 सह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तातडीने भेट दिली. दरम्यान या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहे. मारहाणीत फिर्यादी शुभम माघाडे, कुणाल, ओम, प्रणव अशी चार मुले असून ती सर्व हरेगाव परिसरात राहणारी आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ आज स्वयंस्फूर्तीने हरेगाव बंद पाळण्यात आला. तसेच आज सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्याचे एसपी राकेश ओला, आ.लहू कानडे यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी यांनी भेट देवुन जखमींची साखर कामगार रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यामुळे पोलीस तपासाला वेग आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.