शिवप्रहार न्युज - शासनाची 54 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल...
शासनाची 54 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल...
नेवासा (शिवप्रहार न्यूज)- केंद्र सरकार व राज्य सरकार गरिबांना मोफत उपचार मिळावे याकरिता विविध योजना राबवते, मात्र पैशांसाठी हापापलेले काही डॉक्टर रुग्णावर उपचार केल्याचे भासवून शासनाची फसवणूक करतात. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून, शेवगाव येथील आरोपी डॉक्टर प्रल्हाद गवाजीनाथ पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली असून याप्रकरणी नगरमधील सावेडी, आनंदनगर भागात राहणारे डॉ.सतीश सुधाकर त्रंबके यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांच्याविरुद्ध भादवि कलम 420, 467, 468, 471 प्रमाणे शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ.सतीश त्र्यंबके यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी डॉ.प्रल्हाद पाटील यांने साई पुष्प हॉस्पिटल निळकंठनगर, शेवगाव येथे असताना त्याच्याकडे असलेल्या व्यावसायिक पदाचा गैरफायदा घेऊन ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पदवी नसतानाही फिर्यादीच्या नावे बनावट करारनामा व नोटरी तयार करून फिर्यादीच्या खोट्या सह्या करून अनेक रुग्णांवर उपचार करून ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाकडून 54 लाख 50 हजार 500 रुपये घेऊन शासनाची व माझी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि कंडारे हे पुढील तपास करीत आहे. सध्या आरोपी डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.