शिवप्रहार न्युज - 30 लाखाचा ढंपर चोरणारा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

शिवप्रहार न्युज -  30 लाखाचा ढंपर चोरणारा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

30 लाखाचा ढंपर चोरणारा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

   राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी फॅक्टरी येथील पेट्रोल पंपाजवळून 30 लाख रुपये किंमतीचा ढंपर चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे वय 57 वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी यांच्या मालकीचा 30 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा ढंपर क्रमांक एम.एच.17 ए. जी. 9222 हा दिनांक 05/04/2024 रोजी राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांचे पेट्रोलपंपावर लावलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर ढंपर चोरुन नेला होता. याप्रकरणी राहुरी पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

    याप्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, पोना/संदीप चव्हाण, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

   वरील पथकाने काल शुक्रवारी गुन्हा घडलेल्या ठिकाणी जावुन तेथील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी केली तसेच सदर हायवा ढंपरचे जी.पी.एस. वरुन माहिती घेता सदर ढंपरचे जी.पी.एस. हे खडका फाटा नेवासा येथे बंद झाल्याचे दिसुन आले. त्यानुसार पथकाने रोडचे फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये सदरचा ढंपर हा राहुरी, घोडेगांव, नेवासा फाटा, वाळुंज पंढरपुर, वैजापुर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसुन आला. पथकाने शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयीरित्या दिसुन येत असलेल्या इसमाची ओळख पटवुन त्याचे नांव प्रकाश एकनाथ कदम रा. साकुरी, ता. राहाता असे असल्याचे निष्पन्न केले. 

    प्रकाश कदम याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले ढंपरबाबत सखोल विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार समीरखान नसिरखान पठाण, रा. खंडाळा, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार अशांनी केला असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या ढंपरबाबत विचारपुस करता त्याने सदरचा ढंपर हा नाला नंबर 32 वरील जाधव वस्ती जवळ, रुई शिवार, ता. राहाता या ठिकाणी असलेल्या काटवनात लावलेला असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावुन खात्री करता काटवनामध्ये गुन्ह्यातील ढंपर मिळुन आला आहे. तसेच समीरखान पठाण व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेता ते मिळुन आले नाही. ताब्यात घेण्यात आलेला इसम नामे प्रकाश एकनाथ कदम याच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरी गेलेला 30 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा ढंपर क्रमांक एम. एच. 17 ए. जी. 9222 मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन पुढील तपासकामी राहुरी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे. 

   सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.