शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचे दोघे गंठणचोर राहुरी पोलिसांनी पकडले...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूरचे दोघे गंठणचोर राहुरी पोलिसांनी पकडले...

श्रीरामपूरचे दोघे गंठणचोर राहुरी पोलिसांनी पकडले...

   राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी तालुका हद्दीत धुम स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन गंठणचोरांच्या राहुरी पोलीस पथकाने शोध घेऊन मुसक्या आवळल्या. 

     राहुरी खुर्द येथील सुमती संजय दिघे या दि. २१ मार्च रोजी दुपारी ३.४५ वाजे दरम्यान त्यांचे पती संजय दिघे हे दोघे मोटारसायकलवर राहुरी खुर्द येथून विद्यापीठकडे जात असताना विद्यापीठ येथील पेट्रोलपंपाजवळ पाठीमागुन मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यापैकी मागे बसलेल्या भामट्याने सुमती दिघे यांच्या गळयातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नगरच्या दिशेने धुम ठोकली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       राहुरी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, अशोक शिंदे, पोलीस नाईक गणेश सानप, गणेश लिपणे, संतोष राठोड, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर, चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने सापळा लावला आणि आरोपी अर्जुन हिरामण गोर्डे व महेश दत्तात्रय गवारे दोघे रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले.    

       आरोपीने चोरलेल्या दोन तोळे सोन्याचे मिनी गंठण विकून आलेल्या पैशातील ४ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील करीत आहे.