शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात महिलेचा खून,०२ ताब्यात;नाजुक कारणाची लोकांमध्ये चर्चा…
श्रीरामपुरात महिलेचा खून,०२ ताब्यात;नाजुक कारणाची लोकांमध्ये चर्चा…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- काल गुरुवारी दि.१ ॲागस्टच्या मध्यरात्री १ च्या सुमारास घरात घुसून कुऱ्हाडीने वार करत एका महिलेचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला असून या हल्ल्यात घरातील आणखी दोघे जखमी झाले असून श्रीरामपुरातील वळदगाव-निपाणी शिवारात काल ही घटना घडली.
याबाबत, मुन्ना शेख नूर पठाण, वय-३४, धंदा-ड्रायव्हर, रा.वॉर्ड नं.१, आदर्शनगर, श्रीरामपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मुन्ना पठाण हे श्रीरामपुरात पत्नी व दोन मुलांसह राहतात. मात्र, त्यांची आई शम्मा शेख नूर पठाण या निपाणीवडगाव येथे भाऊ युनूस पठाण, भाची महेक सय्यद व भाचा साहील सय्यद यांच्यासमवेत राहतात. काल मध्यरात्री १ च्या सुमारास वळदगाव आणि निपाणी परिसरात राहणारे आकाश आणि विनोद जे दोघेजण निपाणी येथील शेख नूर पठाण यांच्या घरी आले. त्यावेळी आकाशच्या हातात कु-हाड होती. त्याने कु-हाड ही साहीलच्या डोक्यात मारायला लागला.तेव्हा शम्मा शेख नूर पठाण या वाचवायला मध्ये आल्या. तेव्हा त्यांनाच कुऱ्हाडीचा घाव लागला. त्यानंतर महेक ही मध्ये आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले. निपाणीवडगाव येथे शम्मा पठाण यांच्या शेजारी राहणार जितू धामळे यांच्या फोनवरून महेक हिने मुन्ना पठाण, श्रीरामपूर यांना फोन केला व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुन्ना पठाण हे पत्नी, मेहुण्याबरोबर निपाणीवडगाव येथे लगेच गेले तेव्हा त्यांच्या आईच्या डोक्यात मोठी जखेम होती व त्या रक्ताच्या थारोळयात्न निपचित पडलेल्या होत्या. भाचा साहील हाही खाली पडलेला होता, त्याच्या डोक्यातून रक्त येत होते तर भाची महेक हिच्या गळ्याला, डोक्याला जखमा होत्या.
तातडीने श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटल येथे त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच आई शम्मा पठाण या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मुन्ना शेख नूर पठाण यांच्या फिर्यादीवरून आकाश (पुर्ण नाव माहीत नाही), विनोद (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुरनं. ७७४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या खून प्रकरणातील आकाश आणि विनोद या दोघा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या प्रकाराणात काहीतरी नाजूक कारणाचा वास येत असल्याचे परिसरातील लोकांमध्ये बोलले जात आहे. घटना समजताच सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
याशिवाय श्वानपथक आणि फॉरेन्सिकची टिमलाही पाचारण करण्यात आले होते. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि. नितीन देशमुख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास असून त्यांनी या प्रकणातील दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती दिली. तपासाच्या गोपनीयतेसाठी दुपारपर्यंत पोलिसांनी त्यांची संपूर्ण नावे जाहीर केली नाही. सकाळी-सकाळीच मोठा फौजफाटा बेलापुरातून वळदगावकडे गेल्याने नेमके काय घडले? याबाबत बेलापुरात चर्चेला उधाण आले होते.