शिवप्रहार न्युज - कुटुबीयांनी शिक्षाधीन व न्यायाधीन बंद्यांप्रती सहिष्णुता बाळगावी-श्रीमती अंजु शेंडे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश
कुटुबीयांनी शिक्षाधीन व न्यायाधीन बंद्यांप्रती सहिष्णुता बाळगावी-श्रीमती अंजु शेंडे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश
नगर- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नगर, नगर जिल्हा कारागृह, वर्ग-२, यांच्या संयुक्त विदयमाने मंगळवार, दिनांक २६/११/२०२४ रोजी नव विद्या प्रसारक मंडळाचे सुलोचना सुधाकर भोपे सभागृहामध्ये राष्ट्रीय विधी सेवा सप्ताह अंतर्गत बंद्याच्या कुटुंबियांसाठी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अंजु शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर या होत्या. यावेळी बोलतांना त्यांनी, कुटुबीयांनी बंदी बांधवांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांच्या प्रती सहिष्णुता बाळगून नवे आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन केले. तसेच तुरुंगात राहूनही बंदी शिक्षण घेऊ शकतात. कौशल्यआधारित शिक्षण घेऊ शकतात, जेणेकरून भावी आयुष्यांत त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येते अशी माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव, भाग्यश्री का.पाटील यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज या विषयी माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १५१०० या विषयी सांगितले. ॲड. सागर पादीर यांनी बंदी जणांच्या कायदेशीर हक्काबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. राजाभाऊ शिर्के, यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा कारागृहाचे अधीक्षक, श्री. सुनील वानखेडे, प्राचार्या, महर्षी ग.ज. चीतांबर विद्या मंदिर, श्रीमती. विभावरी रोकडे, लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधिज्ञ ॲड. जरजरी बक्ष शेख, ॲड. कश्यप तरकसे, ॲड. मच्छिद्र देठे, ॲड. वैभव बागुल इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करणेकामी अहमदनगर जिल्हा कारागृह, वर्ग-२, कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.