शिवप्रहार न्यूज- कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरीता विभागीय आयुक्तांची आढावा बैठक…
कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरीता विभागीय आयुक्तांची आढावा बैठक…
शिर्डी-
कोरोना व्हायरसच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरीता नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली.
आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या सभागृहात नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोहीफोडे, पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.सुनिता कडू आदी उपस्थित होते.
श्री.गमे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या ओमीक्रान व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संस्थानने व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने कामकाज केले पाहिजे. संभाव्य लाटेसाठी सज्ज राहिले पाहिजे. यासाठी संस्थांनने 'जीनोम सीक्वेसिंग लॅब' उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून याचा लाभ विविध आजारांवरील व्हेरियंट तात्काळ शोधण्यास मदत होईल. तसेच संस्थानने त्यांच्या रूग्णालयातील सध्याच्या ऑक्सीजन बेड्सच्या संख्येत वाढ केली पाहिजे. यासाठी दानशूर संस्थांना मदतीचे आवाहन करावे, असे सांगुन प्रत्येक दिवशी ५ हजार लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करता येतील असे नियोजन करण्यात यावे. लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन साठी प्लाँट कार्यान्वीत करण्यात यावा. वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सामुग्री, ड्यूरा सिलेंडर आदि बाबींचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना ही यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी दिल्या.
याप्रसंगी संस्थानच्या वतीने कोरोना काळात केलेल्या व सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या उपाययोजनांची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.