शिवप्रहार न्यूज -कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश
कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश...
अहमदनगर: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्तीविरुद्ध आणि आस्थापना विरुद्ध कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत यापूर्वी ज्या घटकांना ठरवून दिलेल्या वेळेत व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही नव्या सवलती प्रशासनाने दिलेल्या नाहीत. यापूर्वी लागू कऱण्यात आलेले प्रतिबंधात्मक नियम सर्वांसाठी लागू आहेत. त्यामुळे या नियमांचे नागरिकांनी पालन करावे आणि कोठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे.तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत तालुका यंत्रणांनी काळजी घ्यावी. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. केवळ कारवाई हे प्रशासनाचे उद्दिष्ट नसून संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्या केल्या जातील. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या कमी होत आहे. वास्तविक, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यातून बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांच्या चाचण्या केल्या जाणे गरजेचे आहे. तरच संसर्ग साखळी आपण तोडू शकू, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.