शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पात्रात दोन वाळू तस्करी करणारे ढंपर जाळले...

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पात्रात दोन वाळू तस्करी करणारे ढंपर जाळले...

श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पात्रात दोन वाळू तस्करी करणारे ढंपर जाळले...

श्रीरामपूर तालुका/प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून नेहमी रात्री वाळू तस्करी चालते. श्रीरामपूर सह , वैजापूर, राहुरी तालुक्यातील वाळू तस्कर हे श्रीरामपूर परिसरातील वाळू तस्करांना हाताशी धरून नायगाव तसेच सराला, गोववर्धन या परिसरातून रात्री बेसुमार वाळू तस्करी करतात. काल नायगाव येथे रात्री गोदावरी नदी पात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी श्री.संदीप मिटके व तहसीलदार श्री.पाटील यांना मिळाली. तातडीने पोलीस व महसूल प्रशासन तसेच स्वतः डीवायएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. आधीच महसूलचे काही कर्मचारी व एस.पी. कार्यालयाकडून पाठविलेला स्पेशल पोलीस फोर्स चे कर्मचारी यांनी नदीपात्रात तीन वाळु गाड्या पकडल्या. एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे काम सुरू असताना दरम्यानच्या काळात मागे अंधारात दोन वाळूच्या ट्रक कोणीतरी अज्ञात इसमांनी पेटवून दिल्या. त्यामुळे या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ ही मोठ्या प्रमाणावर जमा झाले. 

              या ठिकाणी डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळलेल्या वाळू गाड्या व पकडलेली एक वाळू गाडी अशा तीन गाड्या जप्त करून श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या कडे देण्यात आल्याचे संबंधित ग्रामस्थांनी सांगितले. 

               पोलीस व महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत प्रथमच रात्रीच्या वेळी गोदावरी नदी पात्रात वाळू तस्करी करणाऱ्या गाड्या पकडल्याने वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली असून विशेष म्हणजे दोन गाड्या अंधारात जमावाने पेटविल्या ? कि वाळू तस्करी मधील स्पर्धेतून पेटविण्यात आल्या ?या जळालेल्या ढंपरचा मालक कोण आहे ? नेमक्या कोणत्या तस्कराच्या या गाड्या आहेत ? या सर्व बाबींचा तपास होत आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास श्रीरामपूर तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. तर तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घडलेल्या घटनेला दुजोरा दिला.

                दरम्यान नायगाव ग्रामस्थांनी वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे नायगाव भागात तातडीने पोलिस चौकी सुरू करावी अशी आग्रही मागणी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केली आहे. 

          नगरचे पोलिस अधीक्षक श्री.मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर दिपाली काळे यांनी यापूर्वीच वाळू तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना या पुर्वीच दिल्या होत्या.