शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहरात राजकीय पदाधिकाऱ्याने केला शालेय विद्यार्थीनीचा विनयभंग…

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहरात राजकीय पदाधिकाऱ्याने केला शालेय विद्यार्थीनीचा विनयभंग…

श्रीरामपूर शहरात राजकीय पदाधिकाऱ्याने केला शालेय विद्यार्थीनीचा विनयभंग…

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-अल्पवयीन तरूणीला क्लास सुटल्यानंतर मोटारसायकलवर शहराजवळील काटवनात घेवून जावून तिला मारहाण, शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. एका 17 वर्षीय पीडित अल्पवयीन तरूणीला तिचा क्लास सुटल्यानंतर तेथे आरोपी प्रमोद आनंद शिंदे, रा.कांदा मार्केट, श्रीरामपूर हा आपल्या मोटारसायकलवर आला व पीडित तरूणीला गाडीवर बसवून नेवून शहराजवळील काटवनात नेले. तेथे आरोपी प्रमोद हा पीडितेशी जबरदस्ती करू लागला तेव्हा पीडित तरूणीने विरोध केला असता तिला आरोपीने मारहाण करून घाणघाण शिवीगाळ केली. तू माझ्या जवळ ये नाहीतर मी तुला सोडणार नाही, असे म्हणाला. तेव्हा पीडित तरूणी त्याच्या तावडीतून पळाली. 

     त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील काचेने स्वतःचा गळा कापून घेण्याची धमकी दिल्याने पीडित तरूणी त्याच्याजवळ गेली. त्यानंतर आरोपीने तरूणीला पुन्हा क्लास जवळ सोडून दिले.3-4 दिवस आरोपी पीडितेला फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्या भावाला, वडीलांना सांगण्याची धमकी देवून तुझी बदनामी करेल, असे म्हणून पुन्हा काटवनात घेवून जाऊन पीडितेला स्पर्श करून मिठी मारून विनयभंग केला. त्यानंतर दि.23 डिसेंबर रोजी आरोपी प्रमोद शिंदे याने पीडितेचा व त्याचा अर्धवट फोटो पीडित मुलीच्या भावाच्या स्नॅपचॅट अकाऊंटवर शेअर केला. पीडित मुलीच्या भावाने याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

     याप्रकरणी पीडित तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी प्रमोद आनंद शिंदे याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354अ, 354ड, 323, 504, 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.समाधान सुरवाडे हे करीत आहेत.

     सदरचा आरोपी हा शहरातील युवासेनेचा पदाधिकारी आहे. याप्रकारामुळे पालकवर्गात खळबळ उडाली आहे.