शिवप्रहार न्यूज- तर भोंदूना भक्त त्यांची जागा दाखवतील; ‘त्या’ राजकारण्यांना नागरीक धडा शिकवतील-पुलकसागरजी महाराज…

..तर भोंदूना भक्त त्यांची जागा दाखवतील; ‘त्या’ राजकारण्यांना
नागरीक धडा शिकवतील-पुलकसागरजी महाराज…
श्रीरामपूर(प्रतिनिधी)-समाजात भोंदू महाराज-बाबांना भक्त त्यांची जागा दाखवतील तर भ्रष्ट वृत्तीच्या राजकारण्यांना नागरीक धडा शिकवतील, त्यासाठी सत्यवादी जनतेची एकजूट होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय संत जैनमुनी पुलकसागरजी महाराज यांनी श्रीरामपुरात पत्रकारांशी बोलताना केले.
श्रीरामपूर शहरात पुलकसागरजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून त्यानिमित्ताने श्रीराम मंदिराजवळील कासलीवाल यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करताना सद्या सत्य व कष्टकरी नागरीक जनता प्रत्येक ठिकाणी अडचणीत येत आहे. त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे राजकारणी सत्तेचा वापर चांगल्यांना त्रास देण्यासाठी करतात, असे प्रकार समाजात वारंवार घडत आहेत. या प्रश्नावर बोलताना जैनमुनी पुलकसागरजी महाराज म्हणाले की, सितेचे अपहरण झाले तेव्हा रावण रूप बदलून आला होता. तसेच आज समाजामध्ये वाईट वृत्तीचे लोक पांढरे कपडे घालून राजकारणात आहेत तर वाईट विचारांचे लोक धार्मिक क्षेत्रातही महाराज म्हणून घुसले आहेत. त्यामुळे चांगले रूप घेवून वाईट वृत्तीचे लोक वरतून एक व आतून दुसरे अशी वृत्ती वाढीस लागल्याने चांगल्या माणासांना त्रास होत आहे. त्यासाठी सर्व कष्टकरी, सत्यवादी चांगल्या प्रामाणिक माणसांनी संघटीत होवून अशा रूप बदललेल्या चुकीच्या वृत्तीला उघडे पाडले पाहीजे. त्यासाठी संघटीत होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून पुलकसागरजी महाराज म्हणाले की, दिगंबर अवस्था ही आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथात आहे. आपला धर्म लूप्त होवू नये म्हणून जसे आलो आहोत तसेच जाणार या वृत्तीने दिगंबर अवस्था ही संतवृत्ती असल्याचे गौरवाने सांगत पुलकसागरजी महाराज म्हणाले की, भोंग्यांचा प्रश्न गाजला, आवाजामुळे जर कोणाला त्रास होत असेल ते योग्य नाही कारण कोणाला त्रास देणे व कोणाला त्रास होणे हा धर्म असूच शकत नाही.
कट्टरतेचा धोका देशाला आहे. मात्र, कट्टरता ही देशप्रेमाची असावी, असे सांगून पुलकसागरजी म्हणाले की, वापी परिसरात एक भव्य असे अनाथ मुलांच्या शिक्षणाचे, धार्मिक संस्काराचे केंद्र उभारले जात असून तेथे आदिवासींना हाताला काम दिले जात आहे. अनेकांच्या सहयोगातून हा धार्मिक संस्कार केंद्र प्रकल्प प्रगतीपथावर आहे. आज समाजामध्ये चांगल्याला साथ मिळाल्यास निश्चितच कूप्रवृत्तीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रसंत पुलगसागरजी महाराज यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळया प्रश्नांवर त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. ज्याचा जसा चश्मा त्याला तसे दिसते, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी आभार मानले तर पत्रकार अनिल पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व पत्रकार बंधूंना पुलकसागरजी महाराज यांनी आशिर्वाद दिले.