शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरला येत असलेल्या व्यापाऱ्याला लुटणारे पकडले
श्रीरामपूरला येत असलेल्या व्यापाऱ्याला लुटणारे पकडले
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-गेल्या १ फेब्रुवारीला बाभळेश्वर (ता. राहाता) येथून श्रीरामपूरकडे निघालेल्या सोनगावच्या व्यापाऱ्याच्या गाडीचा कट लागल्याचे कारण पुढे करून रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्या डिक्कीतील ३ लाखांची रोकड तिघांनी लांबवण्याचा प्रकार दिवसाढवळया घडला होता. भरदुपारी बाभळेश्वरजवळील विद्याविकास पब्लीक स्कूलच्याजवळ हा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली होती. या लूटीचा तपास लोणी पोलिसांना लावण्यात यश आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या चोरीमध्ये सोनगावच्या व्यापाऱ्याच्याच दुकानात काम करणाराच एक कर्मचारीही सामील असल्याचे पुढे आले आहे. याबाबत लोणी पोलिसांना आणखी एक प्रमुख आरोपीचा शोध घ्यायचा असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज लोणी दौरा असल्याने आरोपींबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
याबाबतची माहिती अशी की, दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनगाव ता. राहुरी येथील गणेश नंदलाल दरक यांची टाटा मेघा गाडी घेऊन त्यांचा चालक श्रीरामपूरकडे खाद्यतेल आणण्यासाठी जात होता. त्याच्याकडे तेलाचे पेमेंट करण्यासाठी तीन लाख रुपये व्यापारी दरक यांनी दिले होते. मात्र बुधवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास चालक बाभळेश्वरच्या विद्या विकास पब्लिक स्कुलच्या पुढे श्रीरामपूरकडे जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची बिनानंबर प्लेटची स्कोडा कार आली. त्यातील तिघांनी कट मारल्याचे कारण सांगत कार आडवी लावून चालक पिंपळे यांना मारहाण केली व गाडीच्या डिक्कीतील ३ लाखांची रोकड घेऊन ते श्रीरामपूर रस्त्याने पसार झाले. व्यापारी दरक यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरक हे अनेक वर्षांपासून श्रीरामपूर येथून खाद्यतेल व गुळाची खरेदी करीत आहेत मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, याप्रकरणी लोणी पोलिसांनी कसून तपास करत ४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक आरोपी हा सोनगाव परिसरातील आहे तर अन्य तिघे हे बाहेरचे आहे. यातील एका आरोपी हा माहितीगार आहे. त्याच्याकडूनच माहिती घेवून ही लूट करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.