शिवप्रहार न्युज - संजय गांधी निराधारचे अनुदान थांबले; लाभार्थ्यांचे हाल,सरकारने तातडीने मदत करावी:- भालेराव

संजय गांधी निराधारचे अनुदान थांबले; लाभार्थ्यांचे हाल,सरकारने तातडीने मदत करावी:- भालेराव
श्रीरामपूर : समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांसाठी संजीवनी ठरणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा निधी गेल्या सहा-सात महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. अपंग, विधवा, परित्यक्ता महिला, निराधार व्यक्ती, तसेच गंभीर आजारांनी त्रस्त लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 अनुदान दिले जाते. मात्र हे अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
अनुदान बंद झाल्याने अनेक निराधार आणि वयोवृद्ध लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या योजनेवर संपूर्णतः अवलंबून असलेल्या व्यक्तींना औषधे, उपचार, तसेच रोजच्या जेवणासाठीही पैसे उरलेले नाहीत. काही विधवा आणि परित्यक्ता महिलांवर लहान मुलांची जबाबदारी असूनही त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने परिस्थिती दयनीय झाली आहे. शासनाने DBT प्रणाली (Direct Benefit Transfer) द्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत मागील सहा महिन्यांचे थकीत अनुदान कधी मिळणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. वारंवार अर्ज, फॉर्म भरण्याच्या सूचनांमुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत.
अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार हयातीचा दाखला सादर करण्यास सांगितले जाते. अनेक वृद्ध आणि अपंग व्यक्तींना तहसील कार्यालय किंवा बँकेत जाऊन हा दाखला देणे कठीण होत आहे. तसेच, काही जणांनी “लाडकी बहिण” योजनेचा लाभ घेतला नाही, म्हणून त्यांना नवीन फॉर्म भरण्यास सांगितले जात आहे, यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. सरकारी योजना फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी,शासनाने या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून थकीत अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. जर लवकरात लवकर थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, तर मोठ्या जनआंदोलनाची तयारी केली जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव यांनी दिला आहे.