शिवप्रहार न्युज - शहरातील विस्थापितांचे आराखड्यानुसार पुनर्वसन शक्य;शिष्टमंडळाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन…

शहरातील विस्थापितांचे आराखड्यानुसार पुनर्वसन शक्य;शिष्टमंडळाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन…
श्रीरामपूर-श्रीरामपुरात काही दिवसापासून नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे शहरातील बाजारपेठ ठप्प झाली आहे.अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असुन त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी या प्रश्नामध्ये लक्ष घालून विस्थापित झालेल्या व्यावसायिक-व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,भाजप जेष्ठ नेते दीपक पटारे, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
एसटी महामंडळ ,सार्वजनिक पाटबंधारे तसेच भाजी मंडई, जुनी पोस्ट कॉलनी गोंधवणी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व त्या त्वरित विकसित केल्या तर सर्व व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.एकट्या एसटी महामंडळाकडे आठ एकराची जागा उपलब्ध आहे.तिथे जर बीओटी तत्त्वावर गाळे व बस स्टॅन्ड उभे केले गेले तर त्या ठिकाणी 700 ते 800 गाळे उपलब्ध होऊ शकतात व भाजीमंडी ही सुद्धा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि ते बांधकाम फार जुने आहे त्या ठिकाणी नवीन पद्धतीने बांधकाम केले तर तेथेही चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.सार्वजनिक पाटबंधारे खात्याच्या अनेक जागा शहरात व शहरालगत आहे तसेच जुने पोस्ट कॉलनी अनेक वर्षापासून भकास व ओसाड अवस्थेत पडली आहे त्याचेही जर आपण पुनर्निर्माण केले तर सर्व प्रश्न सोडवले जाऊ शकता या आशयाचा अहवाल नामदार विखे पाटील यांच्यासमोर या शिष्टमंडळाने सादर केला व हे सर्व प्रश्न आपण सोडवू शकता असे श्रीरामपूरकरांची तीव्र भावना आहे.तरी आपण लवकरात लवकर या गोष्टींचा पाठपुरावा करून तसेच भविष्यात होणारे पाटबंधारे या खात्याचे अतिक्रमण विरोधी मोहिमेला ही स्थगिती द्यावी आणि सर्व नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणीही केली.
नामदार विखे पाटलांनी हा सर्व आराखडा एकदम योग्य असून त्या विभागातील सर्व प्रमुख मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही केल्या व श्रीरामपुरातील सर्व नागरिकांचे पुनर्वसन हे करणारच असे आश्वासनही दिले.
यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख नितीन दिनकर,भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पटारे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल,युवा सेनेचे निखिल पवार ,आम आदमी पार्टीचे विकास डेंगळे यांच्यासह श्रीरामपुरातील अनेक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.