शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील “मुल्ला कटर”चा मॅटर थेट विधानसभेत …
श्रीरामपुरातील “मुल्ला कटर”चा मॅटर थेट विधानसभेत …
मुंबई : श्रीरामपूर मध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतराच्या विषयावर पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी बुधवारी आक्रमकपणे आवाज उठवित संबंधित अधिकाऱ्यांवर व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे शारीरिक, मानसिक शोषण करीत त्यांचे धर्मांतर केल्याच्या श्रीरामपूर शहर व तालुक्यात अठरा घटना घडल्याचा आरोपही आ. कांबळे यांनी केला.
श्रीरामपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस २०१९ मध्ये इम्रान कुरेशी या आरोपीने शाळेतून पळवून आणून लैंगिक अत्याचार केले. तिचे शारीरिक व मानसिक शोषण करीत बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याबाबत आ. नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
अशा पद्धतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने कायदा करण्याची मागणी करीत श्रीरामपूरच्या घटनेतील दोषी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना विनाविलंब बडतर्फ करण्याची मागणी आ. राणे यांनी केली. यावेळी वेगवेगळ्या जातींमधील मुली पळवून त्यांचे धर्मांतर घडविण्यासाठी कशा पद्धतीने आरोपींना पैसे दिले जातात याचे दरपत्रकच आ. राणे यांनी सभागृहात वाचून दाखविले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांतराबाबतचे कायदे अधिक टोकदार करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी आ.कांबळे व आ.राणे यांनी तातडीच्या मुद्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना श्रीरामपूर येथील हिंदू मुलीवरील अत्याचाराचे तसेच धर्मांतराचे हे एकमेव प्रकरण नसून अशी अठरा प्रकरणे असल्याची माहिती सभागृहास दिली.आ. कांबळे म्हणाले की, श्रीरामपूरला मी स्वतः त्या कुटुंबाची भेट घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटून आलेलो आहे. गेल्या सहा महिन्यात श्रीरामपूर परिसरात १८ मुलींचे धर्मांतर झालेले आहे. अशा मुलींचे धर्मांतर करून त्यांचे लग्न ज्याठिकाणी लावून देण्यात आले, तेथील धर्मगुरूंसह संबंधित धार्मिक स्थळांचे पदाधिकारी व दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी केली.