शिवप्रहार न्यूज- बस स्थानकावर विक्रीसाठी आणलेले 3 गावठी कट्टे पकडले; LCB ची कारवाई

बस स्थानकावर विक्रीसाठी आणलेले 3 गावठी कट्टे पकडले; LCB ची कारवाई
नगर(शिवप्रहार न्युज)- बस स्टँडवर विक्रीसाठी गावठी कट्टे घेऊन आलेल्याला ३ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसासह पकडण्याची मोठी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची, जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रा विरोधात कारवाईचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत माहिती घेत असतांना. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, अहमदनगर शहरातील, तारकपुर बस स्थानकात गावठी कट्टे विक्रीस आणणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, कारवाई करीत पथक रवाना केले असता तपासी पथकाने सापळा लावलेला असतांना निळेरंगाचा चेक्स शर्ट, जिन्स पॅन्ट व काळया रंगाची सॅक लावलेला इसम, संशयितरित्या सायकल स्टँड परिसरात फिरत असतांना त्यास पकडण्याच्या उद्देशाने पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने सदर इसमाने तेथून पळ काढत असतांना, पोलिसांनी त्याचा संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून ३ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुस असा एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपी मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला, वय वर्ष ३१, राहणार-खुरमाबाद, तालुका सेंदवा, मध्यप्रदेश याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे व काडतुसे कोणास देण्यासाठी आणले होते, तसेच आणखीन कोणा कोणाचा यामागे हात आहे. याचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड चंद्रकांत कुसळकर आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.