शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरला येणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करून ३ लाख लुटले

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरला येणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करून ३ लाख लुटले

श्रीरामपूरला येणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करून ३ लाख लुटले

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- बाभळेश्वर येथून श्रीरामपूरकडे निघालेल्या सोनगावच्या व्यापान्याच्या गाडीचा कट लागल्याचे कारण पुढे करून रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्या डिक्कीतील ३ लाखांची रोकड तिघांनी लांबवण्याचा प्रकार काल बुधवारी दिवसाढवळया दुपारी बाभळेश्वरजवळील विद्याविकास पब्लीक स्कूलच्याजवळ घडल्याने व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, सोनगाव ता. राहुरी येथील गणेश नंदलाल दरक यांची टाटा मेघा गाडी घेऊन त्यांचा चालक श्रीरामपूरकडे खाद्यतेल आणण्यासाठी जात होता. त्याच्याकडे तेलाचे पेमेंट करण्यासाठी तीन लाख रुपये व्यापारी दरक यांनी दिले होते. मात्र बुधवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास चालक बाभळेश्वरच्या विद्या विकास पब्लिक स्कुलच्या पुढे श्रीरामपूरकडे जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची विनानंबर प्लेटची स्कोडा कार आली. त्यातील तिघांनी कट मारल्याचे कारण सांगत कार आडवी लावून चालक पिंपळे यांना मारहाण केली व गाडीच्या डिक्कीतील ३ लाखांची रोकड घेऊन ते श्रीरामपूर रस्त्याने पसार झाले. व्यापारी दरक यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरक हे अनेक वर्षांपासून श्रीरामपूर येथून खाद्यतेल व गुळाची खरेदी करीत आहेत मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.