शिवप्रहार न्यूज - घरात घुसून महिलेचे दागिने चोरले; जाताना बोकडही नेला...
घरात घुसून महिलेचे दागिने चोरले; जाताना बोकडही नेला...
राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी तालुक्यातील मुळा डॅम परिसरात एका महिलेच्या घरी रात्री १ वा. घुसून महिलेकडील दागिने बळजबरीने चोरून नेत जबरी चोरीचा प्रकार घडला आहे. यावेळी चोरटयांनी घराबाहेर बांधलेला बोकड चोरून नेला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुळा डॅम परिसरात राहणारी रूबीना अहमद शेख ही वृद्ध महिला शनिवार दि.६ रोजी आपल्या नातवासह घरी झोपलेली होती. रात्री १ च्या सुमारास ३ अज्ञात चोरटे दरवाजा तोडून त्यांच्या घरात घुसले व म्हणाले तू जर आरडाओरड केली तर तुला आणि या मुलाला कुन्हाडीने मारून टाकू. तेव्हा ही महिला घाबरल्याने ती गप झोपून राहीली. त्या चोरटयांनी घरात उचकापाचक करत महिलेला पैशांची मागणी केली. यावेळी चोरट्यांपैकी एक उंच आणि जाड माणसाने या महिलेच्या जवळ येवून तिच्या गळयातील मनी, नाकातील मुरणी, कानातील दोन सोन्याचे फुले, कुडके काढून घेतले. चोरटयाने कानातील फुले जोरात ओढल्याने या महिलेच्या कानाला जखम होवून रक्त आले. त्यानंतर जातांना या चोरटयांनी घराबाहेर शेडमध्ये बांधलेला बोकडही चोरून नेत एकूण ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या पाटोळया यांच्या ४ साड्याही चोरून नेल्याचे समजते. याप्रकरणी रूबीना शेख या वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून ३ अज्ञात चोरटयांविरूद्ध राहुरी पोलिसात भादंवि कलम ३४, ३९४, ४५७, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोनि. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करीत आहेत.