शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात व्यापाऱ्याला चाकू लावून लुटणारे दोघे पकडले...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात व्यापाऱ्याला चाकू लावून लुटणारे दोघे पकडले...

श्रीरामपुरात व्यापाऱ्याला चाकू लावून लुटणारे दोघे पकडले...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूरातील टिळकनगर येथील रांजनखोल चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवुन एका व्यापाऱ्यास लुटणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर), रोहित सोपान रामटेके (वय ३१, रां. रांजणखोल) अशी नावे असून त्यांनी आणखी एका अनोळखी साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ ग्रॅम वजनाची ७० हजाराची सोन्याची साखळी, २० हजार रुपये रोख रक्कम, १० हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकुण १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४, रा. खोसे वस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) यांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी २० हजार रुपये खिशात घेतले. त्यानंतर त्यांचा जुना ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडुन उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते.

राहाता येथे प्रशांत डांगे हे भेटले नाही, म्हणुन ते पुन्हा राहाता येथुन गणेशनगर, वाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमी प्रमाणे टिळकनगर कारखान्याचे पाठीमागुन एकलहरे मार्गे बेलापूरकडे जाण्यास निघाले. तेव्हा टिळकनगर येथील रांजनखोल चौकात दुपारी २ वाजेच्या सुमारास आले व चौकातुन पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकु दाखवुन त्यांना धमकावुन त्यांना एकलहरेकडे जाणारे रोडने घेवुन रांजनखोल शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साळुंखे वस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली.

मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवुन पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये तसेच गळ्यातील सोन्याची साखळी व एक विवो कंपनीचा मोबाईल काढुन घेतला. त्यानंतर आणखी पैसे पाहिजे म्हणुन मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आराओरडा केल्याने ते तिघे आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले.

   याबाबत खोसे यांच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पथकाने गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला असता संशयित इसम रईस शेरखान पठाण, रोहित सोपान रामटेके व त्याचा एक अनोळखी साथिदार यांनी सदरचा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात सापळा लावुन, शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. रामेश्वर ढोकणे, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. संभाजी खरात तसेच पो.ना. सचिन धनाड, पो. कॉ. प्रमोद जाधव व पो.कॉ. आकाश भैरट यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत.