शिवप्रहार न्यूज - महिलेची पर्स हिसकावणारा, गाड्या चोरणारा सर्राइत आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी पकडला

शिवप्रहार न्यूज - महिलेची पर्स हिसकावणारा, गाड्या चोरणारा सर्राइत आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी पकडला

महिलेची पर्स हिसकावणारा, गाड्या चोरणारा सर्राइत आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी पकडला

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- काळाराम मंदिराकडून घरी येत असताना सिध्दीवीनायक मंदिर ते सरस्वती कॉलनी रस्त्यावर एका महिलेचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि रोख रुपये २३७ रुपये असलेली पर्स मोटारसायकलवरुन येऊन हिसकावून घेऊन पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी श्रीरामपूर शहरातून जेरबंद केले.

  शहरातील दळवी वस्ती, वॉर्ड नं. ७, येथे राहणाऱ्या सविता ज्ञानदेव निर्मळ या दि. १३ जानेवारी २०२३ रोजी काळाराम मंदिराकडून घरी येत असताना मिरा पतंग दुकानाजवळ एका अनोळखी इसमाने काळ्या रंगाच्या यूनिकॉर्न मोटार सायकलवर त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसका मारुन ओढून चोरून नेली होती.

  या गुन्ह्यांचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत आरोपी तंजील गफ्फार खान, रा. हुसेनगर, वॉर्ड नं. १ श्रीरामपूर हल्ली रा. मुकुंदनगर, अहमनगर याने केला असून तो आज श्रीरामपूर शहरात आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचून त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलसह त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्याकडुने गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला त्याच्या ताब्यात असलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम. एच १७ बी.क्यु ८८४९ ही राहुरी येथून चोरली असल्याचे त्याने कबुल केले. सदर मोटारसायकल चोरी झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. १३९/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

  आरोपी याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ८४९/२०२२ भादवि. कलम ३७९ दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक एमएच १६ बीजे ५३४२ ही त्याचेकडुन जप्त करण्यात आली आहे. आरोपी तंजील गफ्फार खान याचेविरुध्द श्रीरामपूर पोलीस अनेक गुन्हे दाखल आहेत.

  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशाने तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. पाटील, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल, गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक फुरकाने शेख व प्रमोद जाधव यांनी केली असून, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एम.पाटील हे करीत आहे.