शिवप्रहार न्युज - लोणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय अथर्व चा दूर्दैवी मृत्यू…
लोणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय अथर्व चा दूर्दैवी मृत्यू…
लोणी (शिवप्रहार न्युज) -राहाता तालुक्यातील लोणी बु परिसरामध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय अथर्व प्रवीण लहामगेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याने लोणी परिसरात खळबळ उडाली आहे.बिबट्याने या निष्पाप लहान मुलाच्या नरडीचा घोट घेतल्याने घबराट पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लोणी बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय समोर गोसावी वस्तीवर राहत असलेल्या लहामगे कुटुंबातील प्रवीण लहामगे यांचा मुलगा अथर्व हा काल सायंकाळी संदीप नवनाथ गोसावी यांच्या घरी खेळण्यासाठी गेला.त्यानंतर संदीप नवनाथ गोसावी यांचा मुलगा गणेश संदीप गोसावी हे दोघे सोबत दूध आणण्यासाठी गेले. दूध घेऊन आल्यानंतर संदीप गोसावी यांचा मुलगा गणेश हा घरामध्ये दूध देण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने बाहेर येऊन बघितले असता अथर्व त्याला तेथे दिसून आला नाही. त्याला वाटले की अथर्व हा घरी गेला. त्यानंतर अथर्व प्रवीण लहामगे यांच्या घरच्यांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की अथर्व घरी आला नाही. गोसावी कुटुंबाने सांगितले की,अथर्व घरी जाऊन खूप वेळ झाला आहे.
त्यानंतर लहामगे कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला असता रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास अथर्व हा संदीप नवनाथ गोसावी यांच्या मालकीच्या मकाच्या शेताच्या मध्यभागी गंभीर जखमी अवस्थेत सापडला. अथर्वला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप अथर्व मयत झाला.लोणीमध्ये प्रथमच अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. लहामगे कुटुंब ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती.सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कोपरगाव वनविभाग परिक्षेत्राचे वन अधिकारी सागर केदार यांनी घटना ठिकाणी धाव घेऊन घटनेची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले.पिंजरा लावा अशी नागरीकांनी मागणी केली की वन अधिकारी दुर्लक्ष करतात अशा नागरीकांनी तक्रारी केल्या आहे.