शिवप्रहार न्युज - जिल्हा गुन्हे शाखेने ७२ लाखांची रोकड पकडली...

शिवप्रहार न्युज -   जिल्हा गुन्हे शाखेने ७२ लाखांची रोकड पकडली...

जिल्हा गुन्हे शाखेने ७२ लाखांची रोकड पकडली...

   नगर (शिवप्रहार न्युज) - लोकसभा मिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी, २१ मार्च रोजी सायंकाळी उशिरा नगर शहरात दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करत ७२ लाखांची रोकड पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही रोकड हवाल्याची असल्याचा संशय आहे. गुजरातच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या रकमेबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

   निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्नीशस्त्रे यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीसह स्थानिक पोलिसांना नाकाबंदी, गस्त वाढविण्याची आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसे येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच हवाल्याचा व्यवसाय सुरू असलेल्या एका कार्यालयात मोठी रोकड असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने नगर शहरातील ख्रिस्तगल्ली व मार्केटयार्ड परिसरात सायंकाळी छापेमारी करून ७२ लाखाची रोकड ताब्यात घेतली. याप्रकरणी चेतन पटेल व आशिष पटेल (पूर्ण नाव पत्ता नाही) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते मूळचे गुजरात राज्यातील असल्याची माहिती असून, एवढी मोठी रोकड नगर शहरात कशासाठी व कोणासाठी आणली होती, याची चौकशी पोलिस करत आहेत. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि.दिनेश आहेर यांच्या पथकाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हि पहिलीच कारवाई केली आहे.