शिवप्रहार न्युज - पोलिस उपनिरीक्षकाला ९ हजारांची लाच घेताना पकडले...
पोलिस उपनिरीक्षकाला ९ हजारांची लाच घेताना पकडले...
लोणी (शिवप्रहार न्युज)- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात तहसील कार्यालयातील कारवाई टाळण्यासाठी आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान (वय – ५२) यांना लाच स्विकारताना नगरच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, आश्वी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. सदरच्या गुन्ह्यात तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई होणार होती. मात्र ही कारवाई टाळण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान यांनी लाच मागितल्याची तक्रार लाच प्रतिबंध विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे काल शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सापळा लावण्यात आला होता. यावेळी भाग्यवान यांनी १० हजार लाचेची मागणी केली आणि तडजोडी अंती ९ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाच प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराड,रवींद्र निमसे, चापोहेकॉ दशरथ लाड यांनी केली आहे.