शिवप्रहार न्युज - कमलपुरला दुचाकी गोदावरीत कोसळली;नेत्याच्या घरातील माणुस मेल्यावर पुलाला कठडे बांधणार का ??
कमलपुरला दुचाकी गोदावरीत कोसळली;नेत्याच्या घरातील माणुस मेल्यावर पुलाला कठडे बांधणार का ??
श्रीरामपूर- तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कमलपूर- देवगावशनी बंधाऱ्यावर बर्डे यांच्या दुचाकीचा तोल जावुन यमुनाबाई बर्डे,दिलीप बर्डे, रवी मोरे हे गोदापात्रात कोसळले. यावेळी प्रसंगावधान राखत मच्छिद्र बर्डे याने मोटारसायकलीवरून बाजुला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. त्याने आरडाओरड करत इतरांना याविषयी माहिती दिली.
दरम्यान श्रीरामपूर आणि वैजापूर पोलिसांनी दुर्घटनास्थळी धाव घेत मासेमारी करणाऱ्या स्थानिक तरुणांच्या मदतीने यमुनाबाईचा मृतदेह गोदावरीच्या पाण्यातून बाहेर काढला. परंतू दिलीप बर्डे आणि रवी मोरे हे बेपत्ता झाले. उशीरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. विजयादशमी दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कमलपूरवर शोककळा पसरली आहे. दरम्यान यमुनाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल केला होता.
या घटनेमुळे पंचक्रोशीतील अतिशय चिडलेल्या ग्रामस्थांनी नेत्याच्या घरातील माणुस मेल्यावर पुलाला कठडे बांधणार का? पुल बांधणार का ? असा सवाल केला आहे.