शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरकर म्हणतात कोणाला निवडूण द्यायचे ?
श्रीरामपूरकर म्हणतात कोणाला निवडूण द्यायचे ?
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- काल निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. २० नोव्हेंबर मतदान होणार आहे. श्रीरामपूर विधान सभा निवडणुकीसाठी अनेकजण गेल्या काही महीन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांचा 'जांगड गुत्ता' सुरु आहे. आचारसंहीता लागून दोन दिवस झाले तरी एकाही राजकीय पक्षाची उमेदवार यादी जाहिर नाहीच. त्यात यावेळेला राखीव असलेला श्रीरामपूर मतदार संघ शेवटचा कार्यकाळ असल्याने "अभि नही तो कभी नही" अशा प्रमाणे हौशे गौशे नवशे तसेच राजकीय 'धंदा' करून इकडून तिकडे यांच्या बेडूक उड्यांना जोर आला आहे. अजूनही बेडूक उड्या होतीलच अशी श्रीरामपूरची परिस्थिती आहे. त्यात आता 'बाहेरचे पाहुणे' , जातीचा, गटाचा, या नेत्याचा, त्या नेत्याचा, या पक्षाचा, त्या पक्षाचा, राजकीय घराण्यांचा बगल बच्चा, जवळचा, लांबचा, स्थानिक असे मद्दे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे ही चर्चा घडविणारे ही मोजकेच 'निष्ठावंत' नव्हे राजकीय बेडूक उड्या वाले. प्रत्यक्षात काही निवडक विविध क्षेत्रातील प्रमुख नागरीकांशी संपर्क साधला असता ९० % जणांचे म्हणणे आले की, निवडूण द्यायचे कोणाला ? या प्रश्नाने ज्यांनी ज्यांनी पोष्टर बाजी केली, चमकोगिरी केली, फोटो छापले प्रसिद्धी केली ती आतापर्यत फुकटच गेली का ? कारण ज्या ज्या नावांनी आपला चेहरा जनते समोर आणण्याचा प्रयत्न केला त्यातील काहींची नावे १० % नागरीकांनी घेतली, तर ९० % नागरीकांचा उलट प्रश्न होता की, यावेळी निवडून द्यायचे कोणाला ? त्यामुळे सुरवातीची इच्छुकांची 'चमकोगीरी' श्रीरामपूरकरांच्या पचनी पडली नाही हेच त्याच्या प्रतिक्रीयेवरून दिसुन येते. आता काही मोजके कार्यकर्ते असे आहेत की, ते कोठेही कधीही जावू शकतात. त्यामुळे श्रीरामपूरचे मतदार नेमका कोणता उमेदवार श्रीरामपूरचं भलं करील, विकास करील याच्या विचारात आहेत. आता घोड़ा मैदान समोरच आहे काय काय घडामोडी होतात त्यावर आमचेही (श्रीरामपूरकरांचे) लक्ष आहेच.