शिवप्रहार न्युज - पालकांनी मुलांप्रती मित्रत्वाचे नाते जपावे-प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे...
पालकांनी मुलांप्रती मित्रत्वाचे नाते जपावे-प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे...
अहिल्यानगर, दि. १४ - विभक्त कुटुंब पद्धती, बदलेली जीवनशैली आणि संवादच्या अभावामुळे किशोर अवस्थेतील मुलांच्या मनातील भावनांचा कोंडामारा होतो. त्यातून कोणी गैरफायदा घेण्याचा धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांप्रती मित्रत्वाचे नाते जपण्याची गरज आहे. त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार विद्यालयात बालदिनानिमित्त कायदेविषयक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा सप्ताह अंतर्गत कायदेविषयक चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री का. पाटील, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाहक छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, शाळा समितीचे अध्यक्ष नंदकुमार झंवर, सदस्य रवींद्र बाकलीवाल आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शेंडे यांनी बाल कल्याणकारी कायदे, पोक्सो कायदा याविषयी उदाहरणासह सखोल मार्गदर्शन केले. बालकांच्या हक्का विषयी जागृती केली.
प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री का.पाटील यांनी मानवी तस्करीपासून बाल संरक्षण, सामाजिक स्थिती या विषयी सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, बालस्नेही विधी सेवा व संरक्षण योजना २०२४, राष्ट्रीय शिक्षण दिवस, बाल दिन या विषयी मार्गदर्शन केले. टोल फ्री क्रमांक १५१०० व बालकांचा मदत कमांक १०९८ या विषयी माहिती सांगितली.विधी सेवा सप्ताहांतर्गत भिंगारमध्ये कायदेविषयक चिकित्सालयाची स्थापना विद्यालयात करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, विद्यालयाते शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. संस्थेच्या कार्यवाहक छायाताई फिरोदिया यांनी प्रस्ताविक केले. विद्यालयाचे प्राचार्य कासार यांनी आभार मानले.