शिवप्रहार न्यूज- शिर्डीचे साईनाथ रुग्णालय गोरगरीबांसाठी वरदान- जालन्याच्या पेशंट पत्नीची प्रतिक्रिया…
शिर्डीचे साईनाथ रुग्णालय गोरगरीबांसाठी वरदान- जालन्याच्या पेशंट पत्नीची प्रतिक्रिया…
शिर्डी-
जालना येथील उपचार घेवुन बरे झालेले रुग्ण श्री.बंडु नन्नवरे यांची पत्नी सौ.उषाताई नन्नवरे यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे “श्री साईनाथ रुग्णालय हे खरंच आमच्या सारख्या गरीबांसाठी वरदान ठरले आहे.” अशी भावना व्यक्त केली.
जालना जिल्ह्यातील देव पिंपळगांव येथील श्री.बंडु अंकुशराव नन्नवरे हे गेल्या चार वर्षापासुन अर्धांगवायु या आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी अर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांची पत्नी सौ.उषाताई नन्नवरे यांनी शेवटचा उपाय म्हणुन १५ दिवसापुर्वी श्री साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी त्यांना भरती केले होते. श्री.नन्नवरे हे ठण-ठणीत बरे झाल्यामुळे आज त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयातुन घरी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्यांची पत्नी सौ.उषाताई नन्नवरे यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला.
यावेळी सौ.उषा नन्नवरे यांनी व्यक्त केलेली हकीकत अशी की, आम्ही जालना जिल्ह्यातील तालुका बदनापुर मु.पो.देव पिपळगांव येथील रहीवाशी असून चार वर्षापुर्वी माझे पती रात्री ०८.०० वाजता शेतात गेले ते रात्री परतलेच नाही, शोध घेतला असतात ते दुस-या दिवशी दुपारी ४.०० वाजता बेशुध्द अवस्थेत आढळुन आले. त्यानंतर त्यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी घेवुन जाण्याचा सल्ला दिला. घाटी हॉस्पिटल येथे आम्ही आठ दिवस उपचार घेतला, परंतु त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होते नव्हती. त्यावेळी त्यांचे डोळे उघडत नव्हते, हात पाय हालवत नव्हते व कोणालाही ओळखत नव्हते. अर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा अवस्थेत त्यांना आम्ही घरी घेवुन आलो. गेली ०४ वर्ष ते एकाच जाग्यावर पडुन होते. त्यांची ही अवस्था बघवत नव्हती. हा प्रसंग माझा ११ वर्षाचा मुलगा व ०९ वर्षाची मुलगी आणि माझ्यासाठी अतिशय कठीण होता. शेवटी कंटाळुन आमचे एक एकर शेत विकुन पतीला पुणे, मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करुन बरे करण्याचे मी ठरविले. पण त्यावेळी आमच्या गावातील काही लोकांनी सांगितले की, शिर्डी येथे फार छान उपचार होतात. मी लगेच शेतातील कापुस विकुण चारचाकी गाडी भाडेकरीता रक्कमेची व्यवस्था करुन माझ्या पतीला शिर्डी येथे श्री साईनाथ रुग्णालयात आणले.
श्री साईनाथ रुगणालयातील डॉक्टरांना माझ्या पतीला तपासणी करीता दाखविले व त्यांना माझ्या अर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले. येथील डॉक्टरांनी मला धिर देत, माझ्या पतीला रुग्णालयात ताबडतोब भरती करुन घेतले. त्यांनतर त्यांनी काही कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले. ते पुर्ण करुन माझ्या पतीचे संपुर्ण उपचार मोफत करण्यात आले. लगेचच औषध व उपचार चालु झाल्यांनतर दोन दिवसातच आम्ही बोलत असलेले आमच्या पेशंटला समजायला लागले. त्यांनतर स्वतः बोलायला लागले. काही दिवसातर ते स्वतः चालायला व फिरायला लागले आणि आज ते पुर्णपणे बरे झाले असून डॉक्टरांनी त्यांना घरी घेवुन जाण्याची परवानगी दिली आहे, अशी हकीकत सांगुन त्यांनी घरी परतत असताना श्री साईनाथ रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांचे आभार मानले व आपण सर्वांनी दिलेल्या सेवेबद्दल आम्ही नेहमीच ऋणी राहील. तसेच श्री साईबाबांच्या कृपेने माझे पती पुर्णपणे ठिक झाले आहे, अशी भावना ही सौ.उषाताई नन्नवरे यांनी आनंदीत होवुन व्यक्त केली.