शिवप्रहार न्यूज- जळगाव जिल्हा पोलिसांनी श्रीरामपुरातील ०२ जणांना ०४ गावठी कट्ट्यासह धरले;श्रीरामपूरचा बबन फरार…
जळगाव जिल्हा पोलिसांनी श्रीरामपुरातील ०२ जणांना ०४ गावठी कट्ट्यासह धरले;श्रीरामपूरचा बबन फरार…
जळगाव -जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना काही संशयित चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिल्याप्रमाणे पथकाने रविवार (दि.13) रात्री 12 च्या सुमारास चोपडा शहरातील शिवाजी महाराज चौकात सापळा रचला.
संशयित वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यातून 4 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा,ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर),गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनर) पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
फरार आरोपी बबन जाधव हा श्रीरामपूर शहरातील एका भाजपा नेत्याचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता असल्याने या भाजप नेत्याची देखील चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच या घटनेबाबत जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नमूद दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी हा फरार आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये हुंडाई वेरना फोर व्हीलर ज्यावर टायगर ग्रुप अध्यक्ष, श्रीरामपूर असे लिहिलेले ही गाडी जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे दीपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.