शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात हॉटेल चालू करू नको म्हणत एकाच्या खूनाचा प्रयत्न; 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूरात हॉटेल चालू करू नको म्हणत एकाच्या खूनाचा प्रयत्न; 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोडवर असणाऱ्या बाबा पेट्रोल पंपाशेजारील मातोश्री हॉटेल चालू करण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामाऱ्यात काल एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी श्रीकांत पोपट गावडे, वय-२६, धंदा-ड्रायव्हर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी ड्रायव्हरची नोकरी करत असून दिपक काळे याचे बाबा पेट्रोल पंपाशेजारी मातोश्री हॉटेल आहे. हे हॉटेल चालू करायचे म्हणून दोन-तीन दिवसांपासून हॉटेलची साफसफाई सुरू असताना शेजारी राहणारे दत्तात्रय पठारे, बंडू पठारे हे दिपक काळे यास तू हॉटेल चालू करू नकोस म्हणत वाद घालत होते. परंतु, दिपक यास हॉटेल चालू करायचे असल्याने आम्ही साफसफाई करत असताना काल १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ला आम्ही हॉटेल उघडून झाडलोट करीत असताना शेजारी असणाऱ्या पेट्रोल पंपाचे मालक बाबासाहेब हरीभाऊ लबडे तेथे आले व भक्ती काळे यास आपले झालेले वाद आपसात मिटवून घेऊ, आपण शेजारी राहणारे. आहोत, असे म्हणून निघून गेले. मात्र, १२.१५ वा. आम्ही सर्वजण हॉटेलसमोर खुर्च्यावर बसलेलो असताना पेट्रोल पंपाकडून हातात लाकडी दांडे, लोखंडी कत्ती, रॉड घेवून आरोपी आले व त्यांनी शिवीगाळ करत ज्ञानेश्वर आसने, मयूर शिर्के यांना हातातील हत्याराने मारहाण केली. त्यावेळी मी व भक्ती काळे मध्ये पडून सोडवासोडव करीत असताना माझे पोटात लाथ मारूनं खाली पाडले. त्याचवेळी मयूर शिर्के यास हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यावेळी मयूर शिर्के याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहू लागल्याने त्याला तातडीने साखर कामगार हॉस्पीटल येथे ॲडमीट करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला लोणीच्या प्रवरा हॉस्पीटलला ॲडमिट करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
श्रीकांत गावडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात बाबासाहेब हरीभाऊ लबडे, बंडू रखमाजी पठारे, दत्तात्रय रखमाजी पठारे, प्रमोद सोपान शेळके, किरण डांगे, निलेश बाबासाहेब पठारे, रखमाजी पठारे, बाबासाहेब पठारे यांच्याविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूरचे पोनि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान, याबाबत गंभीर जखमी असणाऱ्या मयूर शिर्के याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला आज सोमवारी प्रवरा हॉस्पीटल लोणी येथून नगरच्या मॅक्सकेअर हॉस्पीटल येथे उपचारासाठी हलवल्याचे पोलिसांनी सांगितले.