शिवप्रहार न्युज - नेवासा तालुक्यातील वाकडी येथील काळे दाम्पत्याला मिळाला पांडुरंगाच्या पूजेचा मान…
नेवासा तालुक्यातील वाकडी येथील काळे दाम्पत्याला मिळाला पांडुरंगाच्या पूजेचा मान…
नेवासा/सुधीर चव्हाण
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत पूजा करण्याचा पहिला मान नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब काळे व सौ.मंगलताई काळे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला.त्यामुळे नेवासा तालुक्यातील वारकरी भक्तांनी आनंदोउत्सव साजरा केला.बळीराजासह सर्व सृष्टी सुखी होण्यासाठी विठ्ठलाला घातले साकडे घातले असल्याची प्रतिक्रिया भाऊसाहेब काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
नेवासा तालुका ही संतांची भूमी असल्याने या तालुक्यावर वारकरी संप्रदायाचा पगडा आहे,श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज,उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख,सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हभप उध्दवजी महाराज मंडलिक,महंत सुनीलगिरीजी महाराज हया संत मंडळींचे वास्तव्य व अधिष्ठान तालुक्यात असल्याने तालुक्यात वारकरी संप्रदायाचे वैभव वाढले आहे.मान पान लहान मोठा,उच नीच,भेदभाव याला तिलांजली देत सर्व वारकरी एका झेंड्याखाली एकत्रित आले असून ही किमया येथील संतांच्या कृपेनेच येथे झाली आहे
पंढरपूर येथील आषाढी एकादशीचा मुख्य पूजेचा मान हा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सपत्नीक होण्याची परंपरा असून त्यांच्या या जोडीला वारकरी दाम्पत्याच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे.यावर्षीचा पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत नेवासा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी दाम्पत्य भाऊसाहेब काळे व सौ.मंगलताई काळे यांना मिळाला.ही बातमी महाराष्ट्रासह नेवासा तालुक्यात येऊन धडकल्यानंतर वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा तुळशी हार घालून सन्मान करण्यात आला.
पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठात आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्ताने पंचदिनात्मक सोहळा सुरू असून यानंतर काळे दाम्पत्याने येथे येऊन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.यावेळी सर्व वारकरी भाविकांच्या वतीने गुरुवर्य बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.