शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहराजवळ कत्ती लावून साडेतीन लाखाचा ऐवज लुटला; 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहराजवळ कत्ती लावून साडेतीन लाखाचा ऐवज लुटला; 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- शहराजळील अशोकनगर येथील रेल्वे चौकी नंबर १, भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रोडजवळ दारू पिण्यासाठी 5 हजार रुपये दिले नाही म्हणून तिघांना मारहाण करत कत्तीचा धाक दाखवून 3 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेण्याची घटना सोमवारी रात्री 11ः30च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूरमधील 8 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी किसन झुंबरराव आव्हाड (वय 44) रा. दापूर, ता.सिन्नर व त्यांचे मित्र योगेश दादा लोंढे हे दोघे महिंद्रा एक्सयुव्ही गाडी घेऊन श्रीरामपूर येथे अण्णासाहेब रंगनाथ इंगळे यांचेकडे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आले होते. अण्णासाहेब इंगळे यांच्याबरोबर श्रीरामपूर येथील त्याचा मित्र शोयब इसाक शेख हाही होता. या सर्वांच्या गप्पागोष्टी झालेनंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर किसन आव्हाड व त्याचे मित्र रेल्वे चौकी नंबर 1 अशोकनगर भुयारी मार्गाकडे जाणारे रोडजवळ थांबले असता रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तेथे दोन ते तीन मोटार सायकलवर पाच ते सात इसम आले. ते शोएब शेख याचे ओळखीचे असल्याने ते त्यांना म्हणाले, आम्हाला जेवण करायचे असून दारू पिण्यासाठी ५ हजार रुपये दे. त्यावेळी ते त्यांना आमचेकडे दारू पिण्यासाठी पैसे नाही असे म्हणाले असता त्याचा राग येऊन त्यांनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांना आव्हाड व त्याचे मित्र म्हणाले तुम्ही शिवीगाळ करू नका, जाऊ द्या असे म्हणत असताना त्यांच्या मधील एकाने कमरेस असलेली लोखंडी कत्ती काढून दमदाटी करू लागले व इतरांनीही लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यापैकी एकाने आव्हाड याच्या गळ्यास कत्ती लावून त्याचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 40 हजार रुपये, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, खिशातील 80 हजार रुपये रोख, मित्र योगेश दादा लोंढे याचे खिशातील 20 हजार रुपये, मित्र आण्णासाहेब रंगनाथ इंगळे यांचे खिशातील 30 हजार रुपये रोख रक्कम, मित्र शोयेब इसाक शेख याचे खिशातील 53 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज घेऊन सर्व आरोपी निघून गेले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात किसन झुंबरराव आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सलिम पठाण, अरबाज पठाण दोघे रा-नवी दिल्ली, झोपडपट्टी, वॉर्ड नं 2, श्रीरामपूर तसेच शरीफ कटर, अमोल (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), आकाश साबळे, सोनू साबळे दोघे रा-कांदा मार्केट, वॉर्ड नं 6, श्रीरामपूर तसेच अन्य दोघे अशा आठ जणांविरोधात गुन्हा रजि. नं. 126/2023, भादंवि कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस करत आहे.