शिवप्रहार न्युज - शिर्डीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; डिवायएसपी मिटकेंची कारवाई...
शिर्डीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; डिवायएसपी मिटकेंची कारवाई...
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- बनावट ग्राहक पाठवून शिर्डीत चालणार्या एका बंगल्यातील वेश्या व्यवसायाचा काल पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेची सुटका केली आहे. या छाप्यामुळे शिर्डी परिसरातील काही हॉटेल आणि इतर ठिकाणी चालणार्या अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, काल दि. २ ऑगस्ट रोजी डिवायएसपी संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि दौलत किसन लटके, अंकुश संजय घोडके या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनच्या मपोना. सविता सुधाकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दौलत किसन लटके, अंकुश संजय घोडके यांच्याविरूद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959 चे कलम 3, 4, 5, 7 प्रमाणे शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी डिवायएसपी संदीप मिटके यांचे कौतुक केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी संदीप मिटके, पोनि.गुलाबराव पाटील, हेकॉ. इरफान शेख, पोना.कुर्हे, पोना.शिंदे, जाधव, भांगरे, पोकॉ.गांगुर्डे यांनी केली.