शिवप्रहार न्युज - राजूर येथील अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल;आरोपी LCB कडुन जेरबंद…
राजूर येथील अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल;आरोपी LCB कडुन जेरबंद…
नगर- नमुद बातमीची हकिगत अशी की, दिनांक 05/08/23 रोजी कातळपुर शिवार, राजूर येथे 20 ते 25 वर्षे वयाचे अनोळखी स्त्रीचे प्रेत मिळुन आल्याने राजुर पोलीस स्टेशन येथे अ.मृ.र.नं. 23/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता. परंतु सदर महिलेस गळा आवळुन जिवे मारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने राजूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 254/2023 भादविक 302 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजूर, ता. अकोले येथे निर्जन ठिकाणी अनोळखी महिलेचे प्रेत मिळुन आल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर अकस्मात मृत्युची चौकशी करुन अनोळखी महिलेचे नाव पत्ता निष्पन्न करुन तपास करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/ देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोकॉ/शिरसेना काळे, रोहिणी जाधव, ताई दराडे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण सदर अकस्मात मृत्युची सखोल व बारकाईने चौकशी करुन अहवाल सादर करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
स्थागुशा पथकाने लागलीच कातळपुर, राजूर, ता. अकोले येथील घटना ठिकाणास भेट देवुन अनोळखी मयत महिलेच्या अंगावरील कपडे, दागिने व घटना ठिकाणी मिळुन आलेले सॅण्डेल, पर्स या आधारे मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घटना ठिकाणी मिळुन आलेल्या पर्समध्ये वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन त्यावर जिल्हा परिषद अहमदनगर यांचे वापरा करीता असे लिहलेले गुलाबी रंगाचे पाकिट/रॅपर मिळुन आले. त्यावरुन पथकाने जिल्हा परिषद येथील अधिकारी यांचेशी संपर्क करता त्यांनी वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन हे महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना देवुन पुढे अनुसूचित जातीच्या महिलांना दिले जाते अशी माहिती प्राप्त झाली. पथकाने लागलीच महिला अंमलदारांच्या मदतीने अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सदर मृत महिलेचे फोटो प्रसारीत केले त्यावेळी मृत महिलचे वर्णना प्रमाणे वांबोरी, ता. राहुरी येथील श्रीमती. कल्याणी जाधव या महिलचे वर्णन मिळते जुळते असले बाबत माहिती प्राप्त होताच पथकाने लागलीच वांबोरी, ता. राहुरी येथे जावुन श्रीमती. कल्याणी जाधव यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे कुटूंबियांनी श्रीमती. कल्याणी महेश जाधव, रा. राजवाडा, वांबोरी, ता. राहुरी या दिनांक 04/08/23 रोजी 12.30 वाचे दरम्यान पांढरीपुल, ता. नेवासा येथुन बेपत्ता झाले बाबत सोनई पोलीस स्टेशन येथे 28/23 प्रमाणे मनुष्य मिसिंग दाखल केले असल्याचे कळविले.
सदर अकस्मात मृत्यु मधील मयत महिला व सोनई येथील मिसिंग मधील महिला यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने बेपत्ता कल्याणी जाधव हिचे कुटूंबियाकडे चौकशी केली. दरम्यान महिलेचा पती महेश जाधव व भाचा मयुर साळवे यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत दिसुन आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी कल्याणी हिस भंडारदरा येथे फिरावयाचे कारण सांगुन आरोपी नामे महेश जनार्दन जाधव याने आपला भाचा नामे मयुर अशोक साळवे याचे मदतीने पत्नी कल्याणीच्या चारित्र्याचे संशयावरुन गळा आवळुन खुन केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे 1) महेश जनार्दन जाधव वय 31 व 2) मयुर अशोक साळवे वय 25 दोन्ही राजवाडा, वांबोरी, ता. राहुरी यांना राजुर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. सतत 3 दिवस प्रयत्न करुन खुना सारख्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.