शिवप्रहार न्युज - खून प्रकरणी सोपान राऊतला अटक; ०४ दिवस पोलीस कोठडी...
खून प्रकरणी सोपान राऊतला अटक; ०४ दिवस पोलीस कोठडी...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - निपाणीवडगाव येथील रमेश पवार याच्या खूनातील फरार आरोपी अशोक कारखान्याचा माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपान राऊत याला काल मध्यरात्री १२ वा. श्रीरामपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. राऊतला आज श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी खराडे साहेब यांच्या समोर हजर केले असता दि. १६ ऑगस्ट पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चार महिन्यांपूर्वी निपाणीवडगाव येथे रमेश पवार या इसमाचा मृत्यू झाला. हा मृत्यू झोपेत झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना फोन करून अंत्यविधीच्यावेळी बोलविण्यात आल्याने रमेश पवार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि शवविच्छेदनाच्या अहवालातून रमेश पवार याचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता मयत पवार याची पत्नी संगिता हिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने तिला प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक केली. एका साक्षिदारालाही अटक करण्यात आली. मात्र, पोलिस तपासात स्पष्ट पुढे आले की, रमेश पवार याची हत्या पत्नी संगिता तसेच अजय गायकवाड व प्रसाद भवार यांनी अपहरण करून दारू पाजून त्याला तळयाजवळ नेवून केली आणि या हत्येमागे एका मोठया व्यक्तीचा हात असल्याचे चर्चिले जात असताना यामध्ये आरोपींकडून सोपान राऊत याच्याच सांगण्यावरून हा खून करण्यात आल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याने सोपान राऊत यालाही आरोपी करण्यात आले. तेव्हापासून राऊत फरार होता.
दरम्यानच्या काळात सोपान राऊत याने श्रीरामपूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे सोपान राऊत याला पोलीस कधी अटक करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल सोपान राऊत श्रीरामपूर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री १२.१७ वा. सोपान राऊत याला अटक केली असल्याची माहिती डिवायएसपी बसवराज शिवपुजे यांनी दिली. आरोपी राऊत याला ४ दिवस पोलीस कोठडी मिळाली असून फरार असताना राऊत कोठे लपला होता ? तसेच या खूनात नेमका सहभाग काय आणि कसा ? याची माहिती पोलीस तपासात पुढे येणार आहे. त्यामुळे सर्वांचे पोलीस तपासाकडे लक्ष लागले असून पुढील सुनावणी दि. १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.