शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात “होम थिएटर” वरुन डंग्याने केला मर्डर…
श्रीरामपुरात “होम थिएटर” वरुन डंग्याने केला मर्डर…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - ओळखीच्या मित्राला वापरायला दिलेला होम थिएटर परत मागितला याचा राग येवून मित्राने कटरने वार करून खून करण्याचा खळबळजनक प्रकार शहरातील गोंधवणी परिसरात घडला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रमेश गायकवाड, रा.वडारवाडा, गोंधवणी, वॉर्ड नं.१, श्रीरामपूर याने आपल्या ओळखीच्या असणाऱ्या आकाश बबन ढमके उर्फ डंग्या, रा. गोंधवणी याला आपला होम थिएटर व स्पीकर वापरायला दिला होता. आकाश हा नेहमी घरी येत असल्याने व त्याने होम थिएटर पाहिल्याने रमेश याने त्याला तो दिला होता. बऱ्याच दिवसांनंतर आकाश हा दिसल्यानंतर रमेश याने आपला होम थिएटर आणि स्पीकर त्याला मागितला. तेव्हा आकाश याने त्या स्पीकरबाबत मला काही विचारायचे नाही,माझ्या नादी लागायचे नाही, असे म्हणत धमकी दिली व त्याच्याजवळील कटरने त्याने रमेश याच्यावर वार केला. तसेच डोक्यात लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. रमेश याचा चुलत भाऊ शेखर राजू गायकवाड हा मित्राचा वाढदिवस असल्याने घटनेच्या वेळी जवळच असल्याने तो धावत गेला आणि त्याला आपला जखमी चुलत भाऊ रमेश यास पहिले त्यानंतर जखमीला तात्काळ साखर कामगार रूग्णालय आणि नंतर लोणी येथे उपचारासाठी नेले.
लोणी येथे जखमीवर उपचार सुरू असताना जखमी रमेश गायकवाड याचा मृत्यू झाला. चुलत भाऊ शेखर गायकवाड याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश बबन ढमके उर्फ डंग्या याच्या विरोधात भादंवि कलम ३०७ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी रमेश गायकवाड याचा लोणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर वाढीव कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय. समाधान सोळंके हे करीत आहेत.