शिवप्रहार न्युज - थत्ते मैदानाजवळ ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल धूमस्टाईल पळवला...
थत्ते मैदानाजवळ ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल धूमस्टाईल पळवला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - सायंकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मोबाईल धूम स्टाईल पळवल्याचा प्रकार शहरातील वॉर्ड नं. ७ येथील थत्ते मैदानाजवळ घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक श्री.दशरथ यशवंत नावकर, वय-६० वर्षे, रा.रामचंद्रनगर,श्रीरामपूर हे सायं. ६ वा. आपल्या घरातून चालण्यासाठी थत्ते मैदानाकडे पायी चालत येत असताना ते आपल्या मोबाईलवरून मित्राशी बोलत होते. त्याचवेळी अनोळखी दोघा चोरटयांनी विनानंबरच्या काळया रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर येवून नावकर यांचा मोबाईल ओढून चोरून नेत जोरात पल्सरवरून थत्ते मैदानाच्या वरच्या दिशेने निघून गेले.
यावेळी नावकर यांनी आरडाओरडा केला असता काही लोकानी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी दशरथ नावकर यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी दोघां मोबाईल चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस करत आहे.