शिवप्रहार न्यूज- व्याजाच्या रकमेत सावकाराने घेतलेले ६० लाखांचे घर व जमीन पोलीस निरीक्षकांमुळे मिळाले परत…
व्याजाच्या रकमेत सावकाराने घेतलेले ६० लाखांचे घर व जमीन पोलीस निरीक्षकांमुळे मिळाले परत…
कर्जत दि.७-
गेली अनेक वर्षांपासुन कर्जत तालुक्यात खाजगी सावकारी इतकी बळावली होती की, सावकारकी हा अनेकांचा व्यवसायच बनला होता. या व्यवसायात अनेक बड्या हस्तीही सामील होत्या. गोरगरीब, शेतमजूर,कष्टकऱ्यांना दिलेल्या रकमेच्या व्याजापोटी त्यांच्या जमिनी, वाहने, दागिने, जनावरे आदी सावकारांनी आपल्या घशात घालण्याची अनेक वेगवेगळी प्रकरणे गेली वर्षभरात समोर आली आहेत.अशी प्रकरणे निडरपणे हाताळून ती पुन्हा गोरगरिबांना परत मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमने केले आहे.
चंद्रशेखर यादव यांनी नूकतेच एका नागरिकाला सावकारकीत सावकाराने आपल्या घशात घातलेले अंदाजे ६० लाख रुपये किमतीचे घर व जमीन त्याच्या ताब्यात मिळवून दिली आहे.सावकारकीत गमावलेले डोक्यावरचे छप्पर पुन्हा मिळवून दिल्याने यादव यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
अजय राजाबापु लांडगुले (रा.बुवासाहेबनगर,कर्जत) यांनी कर्जत मधील खाजगी सावकार याच्याकडून सन २०१४ साली ४ रुपये टक्के व्याजदराने ४ लाखांची रक्कम घेतली होती. या रकमेचे महिन्याचे व्याज वसुल करताना सावकाराने कसलीही सीमा ठेवली नाही. तक्रारदाराने व्याजापोटी या सावकाराला काही वेळा व्याज रोख दिले. मात्र एवढयावर हा व्यवहार पुर्ण झाला नाही. फिर्यादीचे भिशीचे पैसे देणे होते, त्यासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते त्याबदल्यात फिर्यादीने आपल्या नावे असलेला साडेचार लाख रुपये किमतीचा प्लॉटही खाजगी सावकाराला यापूर्वी घेतलेल्या पैश्याच्या व्याजापोटी लिहून दिला. तरीही खाजगी सावकाराची भूक भागली नाही. सावकाराची नियत इतकी ढासळली की त्याने तक्रारदाराची पैसे देते वेळी नावावर करून घेतलेली २ गुंठे जमीन नावावर करून देत नव्हता. व्याजासह मूळ रक्कम देऊनही खाजगी सावकाराने केलेली सुलतानी वसुली तक्रारदाराची झोप उडवणारी होती. व्यथित झालेले तक्रारदार अजय लांडगुले यांनी सर्व हकीगत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना कर्जत पोलीस ठाण्यात येऊन सांगितली. यादव यांनी सर्व बाबी पडताळून लागलीच सावकाराला बोलावून 'तक्रारदाराची जमीन आणि राहते घर माघारी नावावर करून दे अन्यथा तुझ्यावर खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल'असे पोलिसी खाक्यात ठणकावून सांगितले. सावकाराने आपल्या ताब्यात घेतलेली जमीन व घर आता नुकतेच तक्रारदाराला परत केले आहे.अजय राजाबापु लांडगुले यांना आपल्या हक्काचे घर परत मिळाल्याने त्यांनी कर्जत पोलिसांचे विशेष आभार मानले.
सावकारकीत पिसलेल्या अनेक कुटुंबांना खऱ्या अर्थाने योग्य न्याय मिळत असून तालुक्यातील सावकारकीचे समुळ कर्जत पोलीसांमुळे हळूहळू नष्ट होतेय ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस जवान मनोज लातूरकर, सलीम शेख, शाहूराज तिकटे, उद्धव दिंडे, प्रवीण अंधारे यांनी केली.