शिवप्रहार न्युज - जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न;जिल्ह्याच्या ९१२ कोटी ७८ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता…
जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न;जिल्ह्याच्या ९१२ कोटी ७८ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता…
अहिल्यानगर दि.१०-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.
एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) एकूण ७०२ कोटी ८९ लक्ष रुपयांचा आराखडा सादर करण्यात येईल. तसेच बैठकीमध्ये एकूण रु.१५० कोटी अतिरीक्त नियतव्ययाची मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
मंजूर प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास ३५ कोटी, ऊर्जा विकास ५० कोटी, कृषी आणि संलग्न सेवा ९९ कोटी २८ लक्ष ८४ हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण ३१ कोटी ८४ लक्ष ३६ हजार, उद्योग व खाण ४ कोटी ३० लक्ष, परिवहन १०९ कोटी, सामान्य आर्थिक सेवा ८९ कोटी २८ लक्ष ६७ हजार, सामाजिक सेवा २१३ कोटी ८७ लक्ष ६८ हजार, सामान्य सेवा १९ कोटी १५ लक्ष, इतर जिल्हा योजना १६ कोटी आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी ३५ कोटी १४ लक्ष ४५ हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत खालील १३ ग्रामीण आणि एक नागरी तीर्थक्षेत्रांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. श्री दत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफ़नाथ (शिप्रागिरी महाराज समाधी) देवस्थान ट्रस्ट, निळवंडे ता. संगमनेर, श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, पुणेवाडी ता. पारनेर, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान, गळनिंब ता. श्रीरामपूर, श्री सद्गुरू धर्मराज देव मंदिर, तांदळी वडगांव ता. नगर, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान मांचीहिल, आश्वी बु. ता. संगमनेर, श्री महालक्ष्मी, मारुती मंदिर देवस्थान, टाकळी ता. अकोले, श्री विठ्ठल देवस्थान ट्रष्ट, मेहेंदुरी ता. अकोले, श्री महादेव मंदिर देवस्थान, डाऊच खुर्द ता. कोपरगाव, श्री महादेव मंदिर देवस्थान, सडे ता. कोपरगाव, श्री राजा विरभद्र देवस्थान, भोजडे ता. कोपरगाव या ग्रामीण भागातील, तर श्री विरभद्र देवस्थान, श्री नवनाथ महाराज मंदिर इ. देवस्थान राहाता शहर, ता. राहाता, श्री जगदंबा माता मंदिर अस्तगाव ता.राहता, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब ता.श्रीरामपूर, श्री भैरवनाथ देवस्थान मिरजगाव कर्जत या शहरी तीर्थक्षेत्राचा यात समावेश आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजना) सन २०२४-२५ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याकरिता एकूण रू. ९३२ कोटी ९३ लक्ष नियतव्यय मंजूर असून एकूण रु. ६९३ कोटी १७ लक्ष किंमतीच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली आहे.
सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२४-२५ आतापर्यंत शासनाकडून प्राप्त ३६४ कोटी ६३ लक्ष रुपये निधीपैकी २४४ कोटी २६ लक्ष निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा निधी १०० टक्के खर्च करुन गुणत्तापूर्ण कामे करण्याचे सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
चालु आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २९७ नविन शाळा खोली बांधकामास मंजुरी देण्यात आलेली असून १०० शाळा खोली बांधकामास मंजुरी देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शेतीकरीता नविन विद्युत रोहित्रे बसविणे, सिंगल फेज रोहित्रे बसविणे, धोकादायक विद्युत वाहिनींचे स्थलांतरण करणे आदी कामासाठी ४० कोटी ४८ लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ६०.८६ टक्के आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ७०.३८ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. मार्च अखेर १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी दिली.
माजी मंत्री कै. मधुकरराव पिचड यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा-पालकमंत्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले. ते म्हणाले, राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत आपल्या विभागासाठी करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करताना लोकप्रतनिधींनींच्या सूचना लक्षात घ्याव्या.
वन विभागाने बिबट प्रवण क्षेत्रात घराभोवती कुंपण घालण्यासाठी आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्ह्यासाठी विशेष योजना प्रस्तावित करावी. बिबट्यांना पकडण्यासाठी प्राधान्याने पिंजाऱ्याची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. वनपर्यटनासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे.
जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्यांसाठी प्रथमच देण्यात आल्या आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या चौथीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृह असावे याकडे विशेष लक्ष घ्यावे आणि त्यांची स्वच्छताही करण्यात यावी. कमी पटसंख्या असलेल्या शाळेजवळ असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल का याचा अभ्यास करावा, अशा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी निधी देण्यात येईल.
बचतगटांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत विचार करण्यात येईल. विविध शासकीय योजनांची माहिती कार्यालयाबाहेर फलकावर प्रदर्शित करण्यात यावी. कार्यालय स्वच्छता, शून्य प्रलंबितता आणि ई कामकाजावर भर देण्यात यावा. कार्यालय परिसरातील अतिक्रमणे १०० दिवस कार्यक्रमात काढावी. सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त ३०० अंगणवाड्यांचे बांधकाम, ३०० जलस्रोतातील गाळ काढणे, ३०० गावे अतिक्रमणमुक्त करणे, पुरातन बारवांची दुरुस्ती, कन्या विद्यालयात सीसीटिव्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करण्यात आला आहे, लवकरच तो शासनास सादर करण्यात येईल. अकोले, भंडारदरा परिसरात साहसी पर्यटन आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीत कालव्याची दुरुस्ती, वीज खंडित होण्याची समस्या, रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे, सोलर वीज पंप योजना, नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, अंमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.