शिवप्रहार न्यूज- मुली व महिलांच्या संरक्षणासाठी आता शाळा व सार्वजनिक ठिकाणी 'आवाहन फलक’…
मुली व महिलांच्या संरक्षणासाठी आता शाळा व सार्वजनिक ठिकाणी 'आवाहन फलक’…
कर्जत दि.१५
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना होणाऱ्या त्रासावर आळा घालण्यासाठी कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी आता भन्नाट उपक्रम राबविला आहे. सर्व शाळा-महाविद्यालये व बसस्थानकात कर्जत पोलीस स्टेशन व २४ तास सुरू असलेला हेल्पलाईन नंबर तसेच स्वतःचा संपर्क क्रमांक असलेले 'आवाहन फलक' लावण्याचे काम सुरू आहे. हे फलक मुली व महिलांसाठी ढाल म्हणून करणार आहेत.
मागील काळात महिला-मुलींना त्रासाबाबतच्या अनेक तक्रारींचा आलेख पाहता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मुली-महिलांना निर्भयतेचे धडे दिले. 'कुणी जर त्रास दिला तर कायदेशीर कारवाई करू' असे आश्वस्त केले. संपर्कासाठी क्रमांक उपलब्ध करून दिले. तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येत असल्याने शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. अनेक मुली-महिलांनी स्वतः यादव यांना फोनवरून तक्रारी केल्या.गुदमरलेल्या अनेक मुलींचा श्वास यादव यांनी क्षणात मोकळा केला. महिला सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेकांवर कायदेशीर कारवाया केल्या. मुलींना पोलीस ठाण्याबाबतच्या कामकाजाची माहिती व्हावी तसेच तक्रार कशी दाखल करावी?पोलिसांचे काम कसे चालते? याबाबत माहिती मिळावी म्हणून मुलींसाठी पोलीस ठाण्यात वेळोवेळी सहलीचे आयोजन केले.असे असताना जेंव्हा मुली शाळा महाविद्यालय भरताना व सुटताना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत असे अनुचित प्रकार घडतात अशावेळी पोलीस यंत्रणेला संपर्क साधता येत नाही मात्र अशावेळी हे आवाहन फलक 'ढाल' बनून मुलींचे रक्षण करणार आहेत. हे फलक लावताना स्वतः पोलीस निरीक्षक हे विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना या फलकाविषयी माहिती देत आहेत. जेंव्हा कोणतीही मदत मिळणार नाही तेंव्हा हे फलकच 'संकटकालीन मार्ग' म्हणून काम करणार आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात मात्र अनेक योजना कुचकामी ठरतात. पोलीस निरीक्षक यादव यांनी मुली- महिलांच्या सुरक्षिततेसाठी आत्तापर्यंत अनेक संकल्पना राबवल्या.त्यामुळे पोलिसांबाबत असलेली भीती, गैरसमज दूर होण्यास मदत झाली. अनेक मुलींना न्याय मिळवून देऊन विश्वास संपादन केला. हे फलक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, बस स्थानक, मुलींचे वसतिगृह तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहेत. आज रोजी सदरचे फलक दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी शाळा, कोटा मेंटर शाळा तसेच दोन मुलींचे वसतीग्रह, कर्जत बस स्थानक या ठिकाणी लावण्यात आले. यावेळी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नगरकर तसेच पत्रकार गणेश जेवरे मोतीराम शिंदे अफरोज पठाण आशिष बोरा पोलीस जवान मनोज लातूरकर, शकील बेग हे उपस्थित होते. हे बोर्ड लावण्या कामी श्री माऊली कदम, जय फेब्रिकेशन, राशीन यांनी आर्थिक सहकार्य दिले त्यासाठी त्यांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले.
*असा आहे आवाहन फलक