शिवप्रहार न्यूज- महावितरण विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपोषण सुरू…
महावितरण विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपोषण सुरू…
श्रीरामपूर -कोरोना महामारीमुळे दोन वर्ष सर्वसामान्य जनता कामधंदा नसल्याने हतबल झालेली असताना महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लॉक डाउन काळात रिडींग न घेता अवास्तव बिल पाठवणे,ज्यांनी बिल भरले नाही त्यांच्या घरी फौजफाट्यासह जावुन धमकावणे व कोणतीही पूर्वसूचना न देता लाईट कट करणे असा अंदाधुंद कारभार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
याबाबत असंख्य नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी करूनही त्याची दखल महावितरणचे कनिष्ठ अभियंता घेत नाहीत.म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहर महावितरणचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते त्याची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे संबंधित विभागास पूर्व लेखी सूचना देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.
सदर उपोषणास समता फाऊंडेशनचे शौकत शेख,लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल,हानिफ पठाण, आजाद हिंदचे बाळासाहेब शेरकर,पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे सुनील महांकाळे, समाजवादी पार्टीचे जोएब जमादार आदींनी पाठिंबा दिला आहे.या आमरण उपोषणास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ ,शहराध्यक्ष रमजान शेख,तालुका सरचिटणीस मायकल मनतोडे, युवक अध्यक्ष भगवान रोकडे, तालुका उपाध्यक्ष संजय त्रिभुवन व पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे सभासद सहभागी आहेत.आज उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषणाला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.