शिवप्रहार न्यूज - गोरगरीबांच्या आयुष्यात समाधान भरणे हेच खरं दैवत्वः जाधव

गोरगरीबांच्या आयुष्यात समाधान भरणे हेच खरं दैवत्वः जाधव
शिर्डी(शिवप्रहार न्युज)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव बोलताना म्हणाले की, मी एप्रिल २०२२ मध्ये उप.कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत झालो. येथे काम करताना मला जो अनुभव आला तो आपल्याशी हितगुज करावा वाटतो. जनमाणसाची सेवा, गोरगरीबांच्या आयुष्यात समाधान भरणे हेच खरं दैवत्व आहे. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले साईबाबा. गोरगरीबांची सेवा करणे याची जाणीव या पदावर आल्यानंतर प्रत्येकाला होणे आवश्यक आहे. जाणीव झाल्यानंतर कर्तव्य व जबाबदारी समजते आणि त्यामुळे सेवा करण्याची पेरणा स्वतः बाबा आपल्याला देतात. बाबांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक साईभक्त बाबांच रुप आहे असे गृहीत धरुनच अधिकारी व कर्मचारी येथे काम करत असतो. प्रत्येक साईभक्ताचे दर्शन सुरळीत व्हावे म्हणुन आपण जे काही प्रयत्न करतो त्याचे निश्चितच बाबा घाआपल्याला आशिर्वाद देत असतात. लवकरच नविन दर्शनरांग व शैक्षणिक संकुल सुरु होणार आहे. हे सर्व काम करत असताना कर्मचा-यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काय करता येईल याचा मी नेहमी विचार करत असतो. कर्मचा-याचा २००९ चा आकृतीबंध व सुधारित नविन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम यामुळे निश्चितच कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक कुटुंब प्रमुख म्हणुन कुटुंबासाठी जेवढ्या काही गोष्टी करता येईल तेवढया सगळया गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल या दृष्टीने असा मानस आहे की, संस्थानच्या शैक्षणिक संकुलात ११ वी १२ वी नंतर निट व जेईई चे वर्ग सुरु करणे. तसेच संस्थानच्या कर्मचा-यांच्या पाल्यांना कोटा सारखे महागडे व आधुनिक शिक्षण शिर्डी येथे कसे उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल, असे सांगुण सर्व कर्मचारी, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही श्री.जाधव यांनी दिल्या.
तसेच यावेळी संस्थानच्या संरक्षण विभाग, फायर ॲण्ड सेफ्टी, सुरक्षा एजन्सीज, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदिंनी आकर्षक परेड व कवायती सादर केल्या. त्यानंतर शैक्षणिक संकुलातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष यश संपादन केलेल्या खेळाडूंना संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व स्मृती चिन्ह देण्यात आले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापक राजेंद्र कोहकडे व अजिंक्यदेव गायकवाड यांनी केले.