शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या विवाहितेवर जादूटोना; गुन्हा दाखल...
श्रीरामपूरच्या विवाहितेवर जादूटोना; गुन्हा दाखल...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- 'तुम्ही फार मोठी चुक केली.. ही मुलगी अपशकूनी आहे.. तुमच्या घरात रोगराई पसरू शकते.. तिच्या अंगात सैतान आहे' असे म्हणत समोर कवटी, हाडं ठेवलेल्या हळद, कुंकू लावलेल्या, केसं मोकळे सोडलेल्या एका महिलेने श्रीरामपूर तालुक्यातील नवविवाहीतेवर जादूटोण्याचा प्रयोग केला आहे. सदर विवाहीतेच्या तक्रारीनंतर कोर्टाच्या आदेशावरून विवाहीतेच्या सासरच्या मंडळींसह जादूटोना करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर पीडित महिला ही 25 वर्षे वयाची असून तालुक्यातील माळेवाडी परिसरात राहणारी आहे. सदर विवाहीतेचे लग्न जुलै 2021 मध्ये अशोकनगर जवळील मंगल कार्यालयात झाले. त्यानंतर ती सासरी नांदायला गेली. 15 दिवसांनंतर सासरचे लोक सासू, नणंद, नवरा हे तिच्याशी वाईट वागू लागले. तिच्याशी बोलत नव्हते. तिच्यावर ओरडायचे. ‘तुझं बाहेर कोणाबरोबर तरी लफडं असल्यामुळेच तुझ्या घरच्यांनी घाईघाईत लग्न करून दिलं', असे म्हणत 'आम्ही लग्न करून फार मोठी चूक केली'. त्यानंतर या विवाहीतेच्या नंदेने विवाहीता बोलत असल्याचे दाखवून तिच्या मैत्रिणीला मेसेज टाकले व या विवाहीतेचे मागे लफडे आहे किंवा काय याबाबत चौकशा करून स्पिकर फोनवर मैत्रिणीला बोलायला लावून सतत संशय घेवून शिवीगाळ सुरू केली तसेच 'तुझी लायकी नाही, तू धूळ खात झोपडपट्टीत पडली होती', असे म्हणत सदर विवाहीतेला घराबाहेर हुसकून दिले. तेव्हा तिच्या वडीलांनी राहुरी बसस्टॅन्डवरून तिला घेवूनय आले. त्यानंतर सासरच्या लोकांनी 5 लाख रूपये इर्टिका गाडी घेण्यासाठी आणण्याची मागणी केली. मात्र, नातेवाईक व इतर समजूतदार मंडळींच्या बैठकीत सासरच्या मंडळींनी आपली चूक मान्य केली व या विवाहीतेला पुन्हा नांदण्यास नेले. त्यानंतर 4 डिसेंबर 2021 रोजी सदर विवाहीतेच्या सासूची मावस बहीण, रा.मिरजगाव, ता.कर्जत येथे या विवाहीतेला सासरची मंडळी घेवून गेली. तेथे तंत्र, मंत्र, भानामती व अघोरी विद्या जाणणाऱ्या आशाबाई नावाच्या महिलेकडे नेले. तेथे या आशाबाईने अघोरी विद्या सुरू केली. तिचे केस उघडे होते, डोक्याला शेंदूर, कुंकू लावलेले होते. गळयामध्ये विविध प्रकारच्या माळा या महिलेने घातलेल्या होत्या. तिच्यासमोर मानवी कवटीसारखे काहीतरी आणि बरीचशी हाडे, प्राण्यांच्या कवटया, हळद, कुंकू, लिंबू, कवड्या, काळे बिबे आदी वस्तू ठेवलेल्या होत्या. सदर महिलेने जादूटोना सुरू करत या विवाहीतेला सासरच्या लोकांनी हातपाय धरून या महिलेसमोर बसवले. जादूटोना करणाऱ्या महिलेने जबरदस्तीने विवाहीतेला हळदी कुंकू आणि कसलीतरी पावडर लावली. तसेच तिच्या तोंडामध्ये कसलातरी उद टाकला, कवटी व हाडावरून सदर उद टाकून अंगात शक्ती आल्यासारखे या महिलेने केले आणि धूर झाल्यानंतर या विवाहीतेला चक्कर आल्यासारखे होऊ लागले. तेव्हा सदर आशाबाई या जादूटोना करणाऱ्या महिलेने अंगात शक्ती आल्यासारखे करत सासरच्या लोकांना सांगितले की, 'या मुलीशी लग्न करायचे नव्हते, ही मुलगी अपशकूनी आहे, तुम्ही फार मोठी चूक केली', असे म्हणत या विवाहीतेच्या पाठीत काठीने मारले आणि हिला तुमच्या घराबाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. सदर प्रकारामुळे सदर विवाहीता घाबरून गेली, तीने आपल्या माहेरी माळेवाडी, ता. श्रीरामपूर येथे घरच्या लोकांना सगळा प्रकार सांगत सासरचे लोक इर्टिका घेण्यासाठी 5 लाख रूपयांची मागणी करत आहे, मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करीत आहेत. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलिसात लेखी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने सदर महिलेने कोर्टात फिर्याद दाखल केली. कोर्टाच्या आदेशान्वये सीआरपीसी 156, 3 अन्वये प्रवीण महादेव कुऱ्हाडे, महादेव कुऱ्हाडे, कमल महादेव कुऱ्हाडे, प्रियांका महादेव कुऱ्हाडे, प्रतिक्षा महादेव कुऱ्हाडे, आशाबाई व इतर चार ते पाच महिला यांच्याविरोधात भादंवि कलम 323, 324, 325, 498अ, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 2 आणि 3 नुसार श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.