शिवप्रहार न्युज - राहुरीतील ॲड.आढाव पती-पत्नीचे खुनी पकडले...

शिवप्रहार न्युज -  राहुरीतील ॲड.आढाव पती-पत्नीचे खुनी पकडले...

राहुरीतील ॲड.आढाव पती-पत्नीचे खुनी पकडले...

   राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड.राजाराम जयवंत आढाव आणि ॲड.मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची हत्या होऊन जिल्हाभर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत २४ तासात खुनी पकडले आहेत. याआधी दोन खूनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला किरण दुशींग आणि त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय 23 वर्षे, रा. येवले आखाडा, ता.राहुरी), शुभम संजीत महाडिक (वय 25 वर्षे, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता.राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय 20 वर्षे, रा.उंबरे, ता.राहुरी) यांना पोलिसांनी पकडले आहे.

    25 जानेवारीला राजाराम जयवंत आढाव व मनिषा राजाराम आढाव हे राहत्या घरातून कोर्टात गेले होते. परंतु नंतर त्यांचा काही संपर्क होऊ न शकल्याने लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिसिंग दाखल केली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस सूचित केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत तपासाची चक्रे फिरवली. राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेल्याचे त्यांना दिसले. संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंगयास ताब्यात घेत सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासुन त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडिक , हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनिल मोरे आदींसह कट केला.

   वकिल दांम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलवले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वत:चे गाडीत बसवून वकिल दांम्पत्यांचे घरी घेऊन गेला. घरामध्ये दोघांचे हात पाय बांधून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये 5 ते 6 तास त्यांचा छळ केला होता. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर नेऊन खून केला. त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये टाकले अशी माहिती त्याने दिली. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.दिनेश आहेर, पोउपनि तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खर्स, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांनी केली आहे.