शिवप्रहार न्युज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवस श्रीक्षेत्र सरला बेटावर...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवस श्रीक्षेत्र सरला बेटावर...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध असे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य गंगागिरीजी महाराज व परमपूज्य नारायणगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली श्रीक्षेत्र सरला बेट गोदाधाम येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सन्माननीय मोहनजी भागवत हे येणार आहेत, अशी माहिती आज विश्व संवाद केंद्र देवगिरी यांच्याकडून सरला बेटाचे महंत. रामगिरीजी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील प्रमुख वीसपेक्षा जास्त संत श्रीक्षेत्र सरला बेट गोदाधाम येथे येणार असून या संतांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ.मोहनजी भागवत हे चर्चा करणार आहेत. वारकरी संप्रदाय तसेच धार्मिक कार्यासाठी काय काय अडचणी येतात किंवा वारकरी व दिंडी यासाठी आणखी काय काय करता येईल. यासाठी उपस्थित संत आपल्या भावना व मत सरसंघचालक मोहन भागवत यांना सांगणार आहे. सप्ताहाच्या एका कार्यक्रमात डॉ.मोहन भागवत यांनी आपल्या परमपूज्य गंगागिरी महाराज यांच्या भव्य दिव्य सप्ताह बद्दल पाहिले ऐकले होते त्यावेळी त्यांनी मी एक वेळ नक्की श्रीक्षेत्र सरला बेटावर मी येईल, असे कबूल केले होते. ते येणार असल्याने आम्हा सर्वांना आनंद झाला असल्याचे सांगून महंत.रामगिरीजी महाराज म्हणाले की, गेल्या काही वर्षात सेक्युलरच्या नावाखाली हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीची, देशाच्या संस्कृतीची पुष्कळदा गळचेपी सुरू होती. मात्र आता प्रभू श्रीरामांचे मंदिर झाल्याने निश्चितच कोट्यावधी भारतीयांना, हिंदू बांधवांना त्याचा आनंद झाला आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतिने दहिभाते यांनी सांगितले की, विश्व संवाद केंद्र देवगिरी, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्गत ग्राम विकास गतीविधीचे पंधरा वर्षापासून हे काम सुरू आहे. 25 प्रांतातून 350 जण या अभ्यासासाठी उपस्थित राहणार असून यामध्ये 50 मातृशक्ती व 300 पुरुष कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंधरा वर्षात काय काय उपक्रम राबविले, कोणते गावे, कोणते संस्कृती जपण्याचे, धार्मिक परंपरा जपण्याचे तसेच जुन्या व्यवसायिक पद्धतीने नव्याने कशी चालना दिली. विषमुक्त शेती यावर चर्चा होणार असून त्याचे प्रदर्शनही या ठिकाणी भरणार आहे. यावेळी आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा अभ्यास वर्ग 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी दत्तात्रय होसबळे, सुरेश उपाख्य भैय्या जोशी, भाग्ययाजी, डॉक्टर दिनेश आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सरला बेटाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कापसे पैठणीचे कापसे यांनी आभार मानले.