शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास १७८.६० कोटी- पालकमंत्री ना.विखे...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास १७८.६० कोटी- पालकमंत्री ना.विखे...

श्रीरामपूरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास १७८.६० कोटी- पालकमंत्री ना.विखे...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- केंद्र शासन पुरस्‍कृत अमृत-२ अभि‍याना अंतर्गत श्रीरामपूर नगर परिषदेच्‍या सुमारे १७८. ६० कोटी रुपयांच्‍या पाणी पुरवठा प्रकल्‍पास प्रशासकीय मान्‍यता मिळाली असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

    केंद्र शासन पुरस्‍कृत अमृत-२ अभि‍यानाची अंमलबजावणी राज्‍यामध्‍ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. सदर अभियाना अंतर्गत राज्‍यातील सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्‍यावर भर देण्‍यात आला असून, यामध्‍ये श्रीरामपूर नगर परिषदेच्‍या पाणी पुरवठा प्रकल्‍पाचाही समावेश झाला आहे. याबाबत शासनाकडे सादर झालेल्‍या प्रस्‍तावास महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण यांनी दिलेल्‍या तांत्रिक मान्‍यतेनंतर राज्‍यस्‍तरीय तांत्रिक समितीच्‍या झालेल्‍या बैठकीत मंजुरी दिल्‍यानंतर आता या प्रकल्‍पास राज्‍यातील महायुती सरकारनेही सुमारे १७८.६० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्‍यता दिली असल्‍याची माहीती पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

   केंद्र शासन पुरस्‍कृत अमृत-२ अभि‍यानाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र शासनाच्‍या असलेल्‍या हिश्‍याचा निधी तीन टप्‍प्यात वितरीत करण्‍यात येणार असून, केंद्र शासनाकडून वितरीत निधीच्‍या प्रमाणात राज्‍य हिश्‍याचा निधी वितरीत केला जाणार असल्‍याचेही शासनाने काढलेल्‍या अध्‍यादेशात नमुद करण्‍यात आले आहे. सदर प्रकल्‍पासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या प्रथम हप्‍त्याचा निधी कार्यादेश निर्गमित झाल्‍यानंतर श्रीरामपूर नगरपरिषदेस वितरीत होणार आहे. या पाणी प्रकल्पासाठी तालुकाअध्यक्ष दीपक पटारे व श्रीरामपुर विधानसभा प्रभारी नितिन दिनकर यांनी पाठपुरावा केला.