शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातून तरूणाला उचलून नेवून बेदम मारहाण...
श्रीरामपुरातून तरूणाला उचलून नेवून बेदम मारहाण...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- एका ड्रायव्हरने दुसऱ्या ड्रायव्हरबद्दल ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाकडे तक्रार केल्याने तक्रार केल्याच्या संशयावरून एकाला श्रीरामपुरातून उचलून नेवून राहुरी फॅक्टरी येथे बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत भारत संजय होलमने, वय-२४, धंदा-ड्रायव्हर, रा. माळवाडगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यातील हकीकत अशी की, भारत होलमने हे महालक्ष्मी ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांच्यासोबत कुलदीप बोबडे, रा.राहुरी व कुमार गिरी, रा. राहुरी फॅक्टरी हे दोघेही कंपनीत लक्झरी बसवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. २० जुलैला भारत होलमने हे मालक गिरीष गायकवाड यांच्या श्रीरामपुरातील मंगलमूर्ती कलेक्शन या दुकानात बसले होते. तेव्हा तेथे कुलदिप बोबडे, कुमार गिरी, धीरज मुसमाडे, प्रफुल्ल झावरे हे आले व बळजबरीने भारत होलमने यांना चारचाकी गाडीत बसवून ते राहुरी फॅक्टरी येथे “न्यू काका का ढाबा” या हॉटेलवर घेवून गेले. तेथे गेल्यावर कुलदिप बोबडे म्हणाला, माझ्याकडून लक्झरी बस घासली हे तू मालकाला सांगितल्यामुळे मालकाने मला कामावरून काढून टाकले. त्यामुळे माझे नुकसान झाले, असे म्हणाला. त्यावेळी त्याने व त्याच्या साथीदाराने आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.तसेच लाकडी फळी डोक्यात मारली. नंतर लोखंडी रॉडने आपल्याला आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर आपल्याला त्यांनी एमआयडीसीकड़े नेले. तेथून पुन्हा राहुरी फॅक्टरीजवळ आल्यावर रस्त्याने मध्यरात्रीच्यावेळी पोलिसांच्या पेट्रोलिंगची गाडी दिसल्यावर आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने भारत होलमने, यांना श्रीरामपुरातील साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसात भारत होलमने यांनी वरिलप्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून कुलदिप बोबडे, कुमार गिरी, धीरज मुसमाडे, प्रफुल्ल झावरे (पुर्ण नावे माहीत नाही) यांच्याविरूद्ध गुरनं. ७९६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.