शिवप्रहार न्युज - खंडाळा येथील 2 वर्षे 1 महिने वयाच्या बालिकेवरील बलात्कारीला जामीन देण्यास खंडपीठाचा नकार…
खंडाळा येथील 2 वर्षे 1 महिने वयाच्या बालिकेवरील बलात्कारीला जामीन देण्यास खंडपीठाचा नकार…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- तालुक्यातील खंडाळा येथील बहुचर्चित बलात्कार प्रकरणात संभाजीनगर उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दिनांक 18.02.2023 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान खंडाळा येथील मोरे यांच्या घरी फिर्यादीची मुलगी वय 2 वर्षे 1 महिना खेळण्यास गेले असता मोरे याने फिर्यादीच्या मुलीचा अज्ञान असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने संभोग केला होता.
त्या संदर्भात दिनांक 19.02.2023 रोजी फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात फिर्याद दिली होती. आरोपी मोरे याने पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर / चार्ज शीट दाखल झाल्यानंतर त्याच्या वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय श्रीरामपूर येथे जामिनासाठी अर्ज केला होता.सदरील अर्ज मा. न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर आरोपीने आपल्या वकिलांमार्फत संभाजीनगर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जावर आज शुक्रवार दिनांक 09.08.2024 रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान फिर्यादीचे वकिलांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात आणून दिल्यानंतर तसेच फिर्यादीचे वय लक्षात घेता व सदरील घडलेला प्रकार हा खूप गंभीर स्वरूपाचा असून आरोपीला जामीन देण्यात येऊ नये.अशा आशयाचा युक्तिवाद केला होता.
सदरील युक्तिवादास ग्राह्य धरत संभाजीनगर उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड अजित चोरमल पाटील यांनी संभाजीनगर उच्च न्यायालय बाजू मांडली.