शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर एमआयडीसीतील कारखाना जळून खाक; १०-१५ अग्निशमन गाड्या दाखल...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर एमआयडीसीतील कारखाना जळून खाक; १०-१५ अग्निशमन गाड्या दाखल...

श्रीरामपूर एमआयडीसीतील कारखाना जळून खाक; १०-१५ अग्निशमन गाड्या दाखल...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर एमआयडीसीत असणाऱ्या सिद्धीविनायक फर्निचर या कारखान्याला आज शुक्रवारी सकाळी मोठी आग लागल्याने या कारखान्यातील कोटयावधी रूपयांचा माल जळून खाक झाला आहे. सुमारे ३ ते ४ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही परंतु, शॉर्ट सर्किट किंवा वेल्डींगमुळे ही आग लागली असावी असा अंदाज घटनास्थळी चर्चिला जात होता.   

       याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर एमआयडीसीत कैलास शिंदे यांचा सिद्धीविनायक फर्निचर हा फर्निचर बनवण्याचा कारखाना आहे. २० गुंठ्यात असलेल्या या कारखान्यात फर्निचर तयार केले जातात. त्यात सोफासेट, टेबल, कॉट, आदी साहित्य बनवले जाते. त्यासाठी लागणारे प्लायवूड, फोम तसेच लेदरचे कव्हर असा मोठ्या प्रमाणावर कच्चामाल या ठिकाणी होता. तसेच तयार फर्निचरही मोठ्या प्रमाणावर होते. 

        आज नेहमीप्रमाणे ९ वा. कारखाना सुरू होत असताना व कामगार येत असताना अचानकपणे या कारखान्याला आग लागली. लाकडी साहित्य, फोम आणि लेदरचे साहित्य असल्याने आगीने मोठा पेट घेतला. आग लागल्यानंतर काही मिनीटात आगीने रौद्ररूप धारण केले व मोठा जाळाचा लोळ तसेच धूर परिसरात निर्माण झाला. आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्यांना बोलावण्यात आले. त्यात सुरूवातील श्रीरामपूर नगरपालिकेची अग्निशामक गाडी आली त्यानंतर अशोक कारखाना तसेच देवळाली प्रवरा नगरपालिका, राहाता नगरपालिका, गणेश कारखाना, संजीवनी कारखाना आदी ठिकाणच्या अग्निशामक गाड्या आग विझविण्यासाठी त्या ठिकाणी आल्या. सुमारे १० ते १५ गाड्यांनी या ठिकाणी या कारखान्याची आग विझवली जात होती. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने शेवटी सिद्धार्थ मुरकुटे आणि एमआयडीसी कारखान्याचे बाबासाहेब काळे यांनी गोदावरी बायोरिफायनरी येथे फोन करून आग विझवण्यासाठीच्या धूराची अग्निशामक गाडी बोलावली. ही गाडी आल्यानंतर मात्र आग जवळपास ८०-९०% आटोक्यात आली. दुपारी १२.३० ते १ वा. आग आटोक्यात आली होती. या आगीत कोट्यावधी रूपयांच्या साहित्याचे, मशिनरीचे नुकसान झाल्याचे समजते.