शिवप्रहार न्यूज -माझं गांव माझी जबाबदारी ! शिर्डीकरांचा एक आदर्श उपक्रम...
माझं गांव माझी जबाबदारी !
शिर्डीकरांचा एक आदर्श उपक्रम...
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
कोरोनामुळे संपूर्ण भारत देश संकटात सापडला आहे. गेली सव्वा वर्षापासून लॉकडाऊनमुळे देशात राज्यात आर्थिक संकट उभे ठाकले असताना साईंच्या शिर्डीत प्रत्येक साईभक्त, व्यापारी, ग्रामस्थ यांच्या भावनेचा विचार करून सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन "माझं गांव माझी जबाबदारी" या आदर्शवादी उपक्रमाची सुरुवात केली आहे.
सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन काही महत्वाचे विषय हाती घेऊन त्यावर प्रत्येकाचे मत ऐकून घेतले त्यामध्ये प्रामुख्याने साईबाबांच्या हयातीत प्राणप्रतिष्ठा केलेल्या हनुमान देवतेच्या दोन मुर्त्या की ज्या आज साई संस्थांनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहे. त्या मुर्त्या पुन्हा हनुमान मंदिरात विधिवत पूजा करून बसवाव्यात तसेच श्री प्रभू राम, सीता व श्रीकृष्ण यांच्याही मुर्त्या म्युझियममध्ये न ठेवता त्यांची मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा करावी.
तसेच साईबाबांच्या हयातीपासून असलेले गुरुस्थान मंदिराचा भव्य स्वरूपात जीर्णोद्धार करून त्याठिकाणी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करता येईल अश्या सुविधा असाव्यात अशा मुख्य मागणीवर विचारमंथन करण्यात आले. सध्या साईबाबांच्या नावाखाली शिर्डीतील तसेच अनेक राज्यातील लोक खोटं सांगून बेकायदेशीर देणग्या भाविकांकडून जमा करून फसवणूक करत आहेत तर शिर्डीतील काहीजण पादुका, चांदीची नाणे, बाबांची भांडी, कपडे व इतर वस्तू असल्याचा दावा करून त्या वस्तू बाहेरील राज्य व देशात जाऊन भाविकांकडून पैसे उकळण्याचा धंदा जोमात करत आहे.त्यामुळे शिर्डीचे बदनामी व भाविकांची फसवणूक होत आहे अशा लोकांवर अंकुश ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सर्व विषयांचे निवेदन करून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कान्हूराज बगाटे यांच्यासमवेत मंगळवार दि.८ जून रोजी सर्व पक्षीय ग्रामस्थ एकत्र येऊन बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा केली. यावेळी बगाटे यांनी सर्व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सर्व मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करणार असल्याचा विश्वास दिला. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे साई मंदिरावर शिर्डीचे अर्थकारण निर्भर असल्याने मंदिर उघडण्याचा निर्णय शासन पातळीवर लवकर घेतला जाईल हेही आवर्जून बगाटे यांनी सांगितल्याने सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. साई संस्थांनच्या कक्षामध्ये या शांततेच्या बैठकी पार पडली. यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, शिवसेना नेते कमलाकर कोते, नगरसेवक अभय शेळके, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, विजय जगताप, बाबासाहेब कोते, संजय शिंदे, नगरसेवक सुजित गोंदकर, ताराचंद कोते, अशोक कोते, नितीन कोते, सचिन कोते, अरविंद कोते, दत्ता कोते, रवींद्र गोंदकर, अमित शेळके, गंगाभाऊ कोते, विनोद गंगवाल आदीसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावच्या हिताचे काही महत्वाचे विषय हाती घेऊन त्यावर प्रत्येकाचे मत ऐकून घेतले.