शिवप्रहार न्युज - तोतया पोलीस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात...
तोतया पोलीस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात...
नगर - नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांना फसविणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस दलात नोकरीला लावून देतो असे सांगून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय ३२ वर्ष, रा.चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता.येवला जि. नाशिक, ह.रा. आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड,नगर) असे आरोपीचे नाव आहे.
भगवान गोविंदा बोराडे (वय ३७ वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, एप्रिल २०२३ मध्ये सचिन प्रशांत पाटील (रा. निफाड जि. नाशिक) याने पोलीस अधिकारी आहे, अशी बतावणी करुन फिर्यादीचा भाचा जय राजु सुसरे व चुलत भावजयी सोनाली पंढरीनाथ बोरुडे या दोघांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. फिर्यादीकडून वारंवार फोन-पे वरून २५ हजार रुपये घेतले होते. तसेच इतर लोकांकडूनही पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. फसवणूक करणारा नाव बदलून वावरणारा आरोपी सचिन पाटील हा मार्केट यार्डच्या मेन गेटजवळ उभा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तोतया पोलीस अधिकारी नाव बदलून वावरत होता तसेच त्याने पोलिसांसारखे दिसणारे गडचिरोली पोलिसांचे ओळखपत्र ही तयार केले होते.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर मोरे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे.